सातारा - छ्त्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी नुकताच खासदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या जाण्याने सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा हादरा बसला आहे. काहीच दिवसांपूर्वी सातारा जावळीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनीही राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपचे कमळ हाती घेतले आहे.
उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशाने जिल्ह्यात राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडले आहे. त्यांच्या भाजप प्रवेशाने राष्ट्रवादीचा अभेद्य मानला जाणारा गड हातातून निसटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
हेही वाचा: शिवसेनेतील 'या' विद्यमान आमदारांचा पत्ता होणार कट? नव्या चेहऱ्यांना मिळणार संधी
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व माढा लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे विद्यमान खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शेखर गोरे यांनीही शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी उदयनराजे भोसले व शिवेंद्रराजे भोसले यांच्यामध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली होती. त्यानंतर त्यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला.
हे सगळे होत असताना काँग्रेसचे माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी देखील अमित शाह यांच्या उपस्थितीत सोलापूर येथे भाजपात प्रवेश केला. यामुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादी व काँग्रेस पूर्ण बॅकफूटवर गेली आहे. राज्यातील राजकारणात सातारा जिल्हा हा कायम राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारधारा जोपासत होता. दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्यापासून आजपर्यंत हा जिल्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. मात्र, आता छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या जाण्याने राष्ट्रवादीला धक्का बसला आहे. या ठिकाणी उदयनराजे भोसले यांना अनेकवेळा पराभवाला देखील सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे आगामी लोकसभा पोटनिवडणूक ही उदयनराजे भोसले यांना सोपी जाणार नाही हे मात्र निश्चित.
हेही वाचा: विधानसभेच्या रणांगणात 'या' महिलांचा आवाज घुमणार, कोण वेधणार लक्ष?
पक्षीय बलाबल सातारा
फलटण - दीपक चव्हाण (राष्ट्रवादी)
वाई - मकरंद जाधव (राष्ट्रवादी)
कोरेगाव - शशीकांत शिंदे (राष्ट्रवादी)
माण - जयकुमार गोरे (काँग्रेस) सध्या (भाजप)
कराड उत्तर - बाळासाहेब पाटील (राष्ट्रवादी)
कराड दक्षिण - पृथ्वीराज चव्हाण (काँग्रेस)
पाटण - शंभूराजे देसाई (शिवसेना)
सातारा - शिवेंद्रराजे भोसले (राष्ट्रवादी) सध्या (भाजप)