सातारा : लंपीचा प्रसार रोखण्यासाठी पशुसंवर्धन विभागाचा फिरता दवाखाना ( Animal Husbandry Mobile Clinic ) गावोगावी जाऊन जनावरांची तपासणी, औषधोपचार करीत आहे. परंतु, फिरत्या दवाखान्याच्या व्हॅनवर अजूनही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचाच फोटो (Uddhav Thackeray photo as Chief Minister) आहे. राज्यात सत्ता बदल झाला. मात्र, पशुसंवर्धन विभागाच्या वाहनांवरील नेत्यांचा फोटो बदल झालेला नाही.
सरकार नवे, फोटो जुनाच : महाराष्ट्राच्या राजकारणात सहा महिन्यापूर्वी मोठी उलथापालथ होऊन महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आले. उद्धव ठाकरे पायउतार झाले आणि एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री बनले. मात्र अनेक सरकारी योजनांच्या जाहीराती, फलक, वाहनांवर मुख्यमंत्री म्हणून अजुनही काही ठिकाणी उद्धव ठाकरे यांचाच फोटो पाहायला मिळत आहे. पशुसंवर्धन विभाग हा त्याचे उदाहरण ठरले आहे.
राज्यात ७२ फिरते दवाखाने : महाविकास आघाडीच सरकारच्या काळात मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजनेंतर्गत जनावरांच्या उपचारासाठी फिरत्या दवाखान्याची संकल्पना पुढे आली. त्यासाठी राज्य सरकारने ७२ गाड्या खरेदी करत त्याला फिरत्या दवाखान्याचे रूप देत सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. सध्या राज्यात सत्ता बदल झाला आहे. मात्र, पशुसंवर्धन विभागाच्या राज्यातील सर्वच गाड्यांवर अजूनही मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचा फोटो असल्याचे पशुसंवर्धन विभागातील कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले.
वरिष्ठांचे मार्गदर्शन घेणार : फिरत्या दवाखान्याची संकल्पना समोर आल्यानंतर शासनाने गाड्या खरेदी करून जिल्हास्तरावर पाठवल्या आहेत. सातारा जिल्हाला ३ गाड्या मिळाल्या. गाड्यांवर तत्कालीन मुख्यमंत्र्यांचा फोटो होता. आता याबाबत वरिष्ठांकडून मार्गदर्शन घेऊन कार्यवाही केली जाईल, अशी प्रतिक्रिया पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त अंकुश परिहार यांनी दिली.