कराड (सातारा)- आज सकाळी कराडसह पाटण तालुक्यातील २९ जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तसेच दोन कोरोनाबाधितांचा उपचार सुरू असताना मंगळवारी रात्री उशीरा मृत्यू झाला आहे. यामुळे कराड, पाटण तालुका प्रशासन हादरले आहे.
कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असणाऱ्या शेजवलवाडी (ता. पाटण) येथील 58 वर्षीय पुरुष आणि वडगाव-उंब्रज (ता. कराड) येथील 59 वर्षीय पुरुषाचा मंगळवारी रात्री मृत्यू झाला. या दोन्ही रूग्णांना दहा दिवसांपूर्वी श्वसन संस्थेच्या तीव्र जंतुसंसर्गामुळे कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
दरम्यान, बुधवारी आलेल्या अहवालामध्ये कराड तालुक्यातील २२ आणि पाटण तालुक्यातील ७ जण कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यामध्ये कराड तालुक्यातील महारुगडेवाडी ३, रुक्मिणी नगर-कराड १ तारुख ८, तुळसण १, शनिवार पेठ-कराड ५, ओंड १ आणि मलकापूर येथील ३ जणांचा समावेश आहे.
पाटण तालुक्यातील नवसरी ३, पालेकरवाडी १ आणि सडा दाढोली येथील ३ जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. पुणे आणि कृष्णा हॉस्पिटलच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या २९८ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असल्याचेही डॉ. आमोद गडीकर यांनी सांगितले.