कराड (सातारा) - विषबाधा होऊन तीन सख्ख्या चिमुकल्या बहिणींचा मृत्यू झाल्याची घटना कराडमध्ये घडली आहे. कराडनजीकच्या सैदापूर गावातील सासवे कुटुंबात ही ह्रदयद्रावक घटना घडली असून आयुषी शिवानंद सासवे (वय ३ वर्षे), आस्था शिवानंद सासवे (वय ९वर्षे) आणि आरूषी शिवानंद सासवे (वय ८वर्षे) अशी या मुलींची नावे आहेत. या मृत मुलींचा व्हिसेरा राखून ठेवण्यात आला असून तो तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहे.
तिन्ही सख्ख्या बहिणींचा मृत्यू
सैदापूर येथील मिल्ट्री होस्टेलनजीक वास्तव्यास असलेल्या शिवानंद सासवे यांचे कुटुंबीय सोमवारी (दि.१४) रात्री जेवण करून झोपी गेले. मध्यरात्री शिवानंद यांच्या पत्नीसह तिन्ही मुलींना उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. त्यामुळे शिवानंद यांनी त्यांना तातडीने सैदापूरमधील डॉक्टरांकडे नेले. डॉक्टरांकडून औषधे घेऊन ते परत घरी आले. परंतु, बुधवारी पहाटे मुलींना पुन्हा त्रास होऊ लागला. त्यामुळे तिन्ही मुलींना कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना आस्था, आयुषी आणि आरूषी या तिन्ही सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाला.
घटनेमुळे सैदापूर गाव सुन्न
या घटनेमुळे सैदापूर गाव सुन्न झाले आहे. शिवानंद सासवे हे अनेक वर्षापासून सैदापूरमध्ये स्थायिक झाले आहेत. ते सरकारी कंत्राटदार आहेत. तिन्ही मुलींच्या मृत्युमुळे सैदापूर गावावर शोककळा पसरली आहे. या घटनेची नोंद कराड शहर पोलीस ठाण्यात झाली आहे. विषबाधेतून ही घटना घडली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. तसेच तिन्ही मुलींचा व्हिसेरा राखून ठेवण्यात आला असून तो तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविला जाणार असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे यांनी सांगितले.
हेही वाचा - मेस्सी-रोनाल्डोचा पाडाव करत लेवंडोवस्कीने पटकावला सर्वोत्तम फुटबॉलपटूचा पुरस्कार