सातारा - विहिरीजवळच्या शेतात फुले तोडण्यासाठी गेल्यानंतर वीजेचा शॉक लागून विहिरीत पडल्याने तिघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तासवडे (ता. कराड) गावात शुक्रवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेत दीर, भावजयीसह एका मुलाचा मृत्यू झाला (Three people died due to electric shock) आहे. हिंदुराव मारुती शिंदे (वय ५८), सीमा सदाशिव शिंदे (वय ४८) आणि शुभम सदाशिव शिंदे (वय २३), अशी मृतांची नावे असून दोघेजण या घटनेतून बचावले आहेत.
ऐन गणेशोत्सवात तासवडे गावावर शोककळा - तासवडे (ता. कराड) येथील शिंदे वस्तीत राहणारे हिंदुराव मारुती शिंदे, त्यांची भावजय सीमा सदाशिव शिंदे आणि पुतण्या शुभम सदाशिव शिंदे हे सायंकाळी विहिरीजवळच्या शेतात फुले तोडण्यासाठी गेले होते. त्यावेळी अचानक शॉक लागल्याने तिघेजण विहिरीत फेकले गेले आणि त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर नागरीकांनी विहिरीकडे धाव घेतली. मात्र, मारुती शिंदे, त्यांची भावजय सीमा सदाशिव शिंदे आणि पुतण्या शुभम सदाशिव शिंदे यांचा मृत्यू झाला होता, तर नीलेश शंकर शिंदे (वय 25) आणि विनोद पांडुरंग शिंदे (वय 40) हे दोघेजण सुदैवाने बचावले. ऐन गणेशोत्सवात घडलेल्या या घटनेमुळे तासवडे गावावर शोककळा पसरली आहे.
तासाभरानंतर मृतदेह बाहेर काढले - शॉक लागल्याच्या घटनेनंतर सुमारे तासाभरानंतर तिघांचेही मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले. ऐन गणेशोत्सवात घडलेल्या या घटनेमुळे शिंदे वस्तीवर शोककळा पसरली. रात्री उशीरा तिघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी कराडला हलविण्यात आले. या धक्कादायक घटनेमुळे तासवडे परिसरावर शोककळा पसरली आहे.