कराड (सातारा) - मांडूळ तस्करी करणार्या तिघांना सातारा वनविभागाच्या फिरत्या पथकाने शिरवळ (जि. सातारा) येथे ( Three arrested in Eryx johnii Snake smuggling ) पकडले. संशयितांकडून जिवंत मांडूळ, एक मोटरसायकल आणि तीन मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत. याप्रकरणी रवींद्र महादेव कंगाळे (रा. श्रीराम नगर, शिरवळ), अनिकेत तात्यासो यादव (रा. कवठे-मसूर, ता. कराड) आणि संतोष दिनानाथ काटे (रा. भांबे-उंब्रज, ता. कराड) यांना अटक करण्यात आली आहे.
पथकाने रचला सापळा -
मांडूळ जातीच्या सापाची विक्रीसाठी तिघेजण शिरवळ येथे येणार असल्याची गोपनीय माहिती मानद वन्यजीव रक्षक तथा वन्यजीव अपराध नियंत्रण बुरो सदस्य रोहन भाटे यांना मिळाली. भाटे यांनी सातारा वनविभागाच्या फिरत्या पथकाचे वनक्षेत्रपाल सचिन डोंबाळे यांना तात्काळ माहिती दिली. डोंबाळे हे तातडीने आपल्या पथकासह शिरवळमध्ये पोहोचले. शिरवळ-लोणंद मार्गावरील पशुवैद्यकीय दवाखान्याजवळ सांयकाळी 5 वाजता संशयित मांडूळ विक्रीसाठी येणार असल्याची खात्रीलायक माहिती समजली. त्यानुसार डोंबाळे यांच्या पथकाने सापळा रचला.
आरोपीकडून मांडूळ जप्त -
हिरो-होंडा पॅशन मोटारसायकलवरून (क्र. एम. एच. 11 बी. एफ. 2954) तीन जण तेथे आले. ते संशयास्पदरित्या घुटमळत असताना वनविभागाच्या फिरत्या पथकाने त्यांना शिताफीने पकडले. त्यांच्याकडील साहित्याची तपासणी केली असता जिवंत मांडूळ (इंडियन सँड बोआ) आढळला. मांडूळ सापासह गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल आणि तीन मोबाईल वनविभागाने ताब्यात घेतले. वन्यजीव (संरक्षम)अधिनियम 1972 नुसार मांडूळ साप हा शेड्युल 4 मध्ये येतो. आरोपींकडून जप्त केलेल्या मांडूळाची लांबी 141 सेंटीमीटर आणि वजन 2 किलो 300 ग्रॅम आहे.