कराड (सातारा) - दोन व्यक्ती मास्क घालून बंदूक घेऊन ताजमध्ये घुसणार असल्याच्या धमकीचा कॉल करणार्या कराडमधील अल्पवयीन मुलासह त्याच्या कुटुंबीयांना पोलिसांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. निनावी फोन करणारा मुलगा 14 वर्षांचा असून, तो नववीत शिकत आहे. कराडच्या सोमवार पेठेतील तो रहिवासी आहे. सध्या कराड शहर पोलीस ठाण्यात त्याचा आणि कुटुंबीयांचा जबाब घेण्याचे काम सुरू आहे.
- ताज हॉटेलमध्ये बाॅम्ब ठेवल्याचा आला होता कॉल -
मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये दोन अतिरेकी घुसणार असून, हॉटेलमध्ये बाॅम्ब ठेवणार असल्याच्या निनावी कॉलने ताज हॉटेल व्यवस्थापनासह मुंबई पोलीस दलात खळबळ उडवून दिली. मुंबई पोलिसांनी कॉल डिटेल्स तपासली असता, कराडमधून निनावी कॉल आल्याचे निष्पन्न झाले. त्याआधारे कराड पोलिसांना माहिती देण्यात आल्यानंतर कराडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी आपली पथके पाठवून मुलासह त्याच्या कुटुंबीयांना ताब्यात घेतले. त्यांना पोलीस ठाण्यात आणल्यानंतर चौकशी करण्यात आली.
- गुगलवरून ताज हॉटेलचा फोन नंबर मिळवला -
निनावी फोन करणारा मुलगा 14 वर्षांचा आहे. तो इयत्ता नववीत शिकत असून गुगलवरून ताज हॉटेलचा फोन नंबर मिळवून मोबाईलवरून त्याने ताज हॉटेलमध्ये कॉल केला. ताज हॉटेलच्या मागच्या गेटवर सुरक्षा वाढवा, कारण दोन व्यक्ती मास्क घालून बंदूक घेऊन ताजमध्ये घुसणार असल्याचे सांगितले होते. टीव्हीवरील मालिका आणि चित्रपट पाहून आपण हे कृत्य केल्याचे त्या मुलाने पोलिसांना सांगितले. दरम्यान, मुलाने केलेल्या कृत्याबद्दल त्याच्या कुटुंबीयांना कसलीही माहिती नव्हती. त्याच्या आई आणि वडीलांनी पोलिसांना तसा जबाब दिला आहे. संबंधित मुलगा आणि त्याचे आई-वडील अद्याप पोलीस ठाण्यात असून त्यांचा जबाब नोंदविण्याचे काम सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी दिली.