सातारा - स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला जेरबंद केले आहे. या टोळीला पकडल्यानंतर त्यांनी 25 गुन्ह्यांची कबुली दिली आहे. यामध्ये भावज्या उर्फ बाबू भोसले उर्फ काळे (वय-19), सुर्यगन उर्फ गाल्या शेज्या भोसले (वय-19) अतिक्रमण विजय काळे (वय 29, रा.रेवडी ता.कोरेगाव)अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
एलसीबीचे पथक सातारा-लोणंद रस्त्यावर गस्त घालत होते. रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास वडूथ गावच्या हद्दीत काही संशयित दबा धरुन बसले होते. एलसीबीच्या पथकाने संशयितांना हटकल्यानंतर त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले. यानंतर झडती घेतल्यावर त्यांच्याकडे हत्यारे सापडली. याबाबत पोलिसांनी चौकशी केल्यानंतर हे भामटे दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे समोर आले आहे.
पोलिसांनी याप्रकरणी संशयितांकडे अधिक चौकशी केल्यानंतर त्यांनी यापूर्वी दरोडा व घरफोड्या केल्याची मालिकाच सांगितली. या टोळीने सातारा तालुक्यातील वाढे, कराड, कोरेगाव, शिवथर, बोरगाव या ठिकाणी तब्बल 25 घरफोड्या केल्याची कबूली दिली. तसेच यामधील अनेक घटना पोलीस ठाण्यात दाखल नसल्याचेही समोर आले आहे. यामुळे पोलिसांनी नजीकच्या पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचे आवाहन केले आहे.