सातारा : महाबळेश्वर-तापोळा मार्गावरील मुकदेव घाटात मजुरांच्या टेम्पोला भीषण अपघात झाला आहे. मजुरांना घेऊन निघालेला टेम्पो दरीत कोसळल्याने महिला, लहान मुलांसह अनेक मजुर जखमी झाले आहेत. जखमींमधील चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना सातारा जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. टेम्पोचा ब्रेक फेल झाल्यामुळे हा भीषण अपघात झाला असल्याची माहिती मिळत असून; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरे-तांब गावातील रस्त्याच्या कामावर घेऊन जाताना ही दुर्घटना घडली आहे.
अपघातानंतर तातडीने बचावकार्य : मजुरांना कामावर घेऊन जाताना महाबळेश्वर-तापोळा रस्त्यावरील मुकदेव घाटात एका अवघड वळणावर टेम्पो दरीत कोसळला. टेम्पोत 40 मजूर होते. अपघात झाल्याचे समजताच आजुबाजुचे नागरीक आणि महाबळेश्वर प्रशासनाने तातडीने बचाव कार्य सुरु केले. दरीतून जखमींना बाहेर काढून महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार करून सातारा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
ब्रेक फेल झाल्याने अपघात : बुरडाणी घाटातील एका अवघड वळणावर टेम्पोचा ब्रेक फेल झाला. यावेळी टेम्पो चालक प्रदीप खंडू कुरदने याने प्रसंगावधान राखून टेम्पोवर ताबा मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, टेम्पो तीनशे फूट खोल दरीत कोसळला. याच घाटामधून प्रवास करणार्या तळदेव येथील नागरीकांनी अपघाताची घटना पाहून तळदेव प्राथमिक आरोग्य केंद्राला माहिती दिली. सह्याद्रि टे्रकर्सचे कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरीकांनी जखमींना दरीतून वर काढत खासगी वाहनांतून प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.
मुख्यमंत्र्यांच्या गावी जाताना अपघात : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरे-तांब (ता महाबळेश्वर) गावातील रस्त्याच्या कामासाठी पुण्यातील चाकण भागातून 40 मजुरांना टेम्पोतून आणले होते. त्यांना कामाच्या ठिकाणी घेऊन जाताना टेम्पोला भीषण अपघात झाला. टेम्पोतील 11 मुले, 10 महिला आणि 8 पुरुष मजुरांची प्रकृती स्थिर असल्याने त्यांच्यावर तळदेव आरोग्य केंद्रातच उपचार सुरू आहेत. तर 11 जखमींवर महाबळेश्वर ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यातील दोन महिला मजूर गर्भवती आहेत.
चौघांची प्रकृती गंभीर : टेम्पो दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात जखमी झालेल्या मजुरांमधील चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना सातारा शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. महाबळेश्वर, जावळी हा संपूर्ण भाग घाट रस्त्यांचा आहे. त्यामुळे घाट मार्गांवर सातत्याने पर्यटकांच्या वाहनांचे अपघात होण्याच्या घटना घडतात. अपघातानंतर जखमींना तातडीने उपचार मिळण्यासाठी महाबळेश्वरमध्ये सुसज्ज सरकारी रूग्णालयाची आवश्यकता आहे.
जखमींची नावे : टेम्पो अपघातात आर्वी चव्हाण (वय 9), पिले मोहिते (वय 10), दादाराव चव्हाण (वय 50), अजय मोहिते, मंगल मोहिते (वय 22), प्रवीण मोहिते (वय 30), आरोही चव्हाण (वय 2), मंदा चव्हाण (वय 60), आरती चव्हाण (वय 17), पवन चव्हाण (वय 18), निर्जला चव्हाण (वय 20), साक्षी मोहिते (वय 22) हे सर्वजण किरकोळ जखमीं झाले आहेत. अन्य जखमींची नावे अद्याप मिळू शकलेली नाहीत.