कराड (सातारा) - तालुक्यातील उंब्रज-शिवडे येथील पेट्रोल पंपावर दरोडा टाकणार्या संशयितांना पोलिसांनी बुधवारी सिनेस्टाईलने पकडले. विद्यानगरमध्ये पोलिसांनी अडीच तास केलेली व्यूव्हरचना पाहून एन्काऊंटर होण्याचीच शक्यता अधिक होती. तथापि, पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन सहाही दरोडेखोर शरण आले आणि एन्काऊंटरचा प्रसंग टळला.
कराड तालुक्यातील उंब्रज-शिवडे येथील पेट्रोल पंपावर सोमवारी रात्री बाराच्या सुमारास सहा जणांनी सशस्त्र दरोडा टाकला. कर्मचार्यांना जबर मारहाण करून 25 हजारांची रोकड लंपास केली. त्यांच्याकडे गावठी कट्टे होते. घटनेला 38 तास होत आले असताना कराडचे पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील आणि गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक विजय गोडसे यांना खबर्याने दरोड्यातील संशयितांपैकी एकाबाबत माहिती दिली.
खबर्याच्या माहितीनुसार पोलिसांनी त्या संशयितावर पाळत ठेवली. सैदापूर-विद्यानगरमध्ये तो भाड्याच्या घरात राहत असल्याचे स्पष्ट झाले. पेट्रोल पंप दरोड्यातील संशयित म्हणून त्याचा सहभाग स्पष्ट झाला. दरोड्यातील सर्वजण विद्यानगरमधील घरामध्ये असल्याची पक्की खात्री होताच सातारच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील हे तातडीने कराडमध्ये दाखल झाले. कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक विजय गोडसे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर सातारहून शीघ्र कृती दल आणि राखीव दलाच्या तुकडीलाही पाचारण करण्यात आले.
हेही वाचा - पेट्रोल पंपावर दरोडा टाकणारी टोळी गजाआड; विकास दुबे टोळीशी लागेबांधे असल्याचा संशय
सहा संशयितांपैकी एक सातारा जिल्ह्यातील नरवणे (ता. माण) आणि इतर पाच जण उत्तर प्रदेशचे असल्याची माहितीही पोलिसांकडे होती. तसेच उत्तर प्रदेशमधील पाच जणांमधील एक जण उत्तर प्रदेश पोलिसांच्या एन्काऊंटरमध्ये ठार झालेल्या कुख्यात गुंड विकास दुबेचा भाचा असल्याचीही माहिती मिळाली होती. तसेच त्यांच्याकडे गावठी कट्टे असल्यामुळे पोलीस सतर्क होते. या सर्व शक्यता गृहीत धरून पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया यांनाही परिस्थितीचे गांभीर्य सांगितले.
दरोडेखोरांना पकडण्यासाठी अधिकारी आणि कर्मचारी मिळून 30 जणांचा फौजफाटा दुपारी विद्यानगरमध्ये पोहोचला. शीघ्र कृती दल, राखील दलाची तुकडी, कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कर्मचार्यांचा त्यामध्ये समावेश होता. शिवाय पथकामध्ये 8 पोलीस अधिकारीही होते. सर्वजण फौजफाट्यासह विद्यानगरमध्ये पोहोचले. दाट लोकवस्तीचा परिसर असल्यामुळे पोलिसांनी संशयित राहत असलेला परिसर निर्मनुष्य करण्याची शक्कल लढविली. होली फॅमिली इंग्लिश मीडियम स्कूल परिसरात कंटेन्मेंट झोनचा फलक लावला. बॅरिकेटस् लावून सर्व परिसर सील केला. त्यानंतर पोलिसांच्या गाड्या, रुग्णवाहिकाही तेथे दाखल झाली.
हेही वाचा - 'आधी मराठा आरक्षण नंतर पोलीस भरती; अन्यथा परिणामांना सामोरे जा'
घटनास्थळी पोहोचताच शीघ्र कृती दलाच्या जवानांनी अंगात बुलेटप्रुफ जॅकेटस् घातली. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी त्यांना सूचना केल्या. बाकीचे अधिकारी चारी बाजूने पुढे सरकू लागले. कराडचे पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी स्पीकरवरून संशयितांना शरण येण्याचे आवाहन केले. एव्हाना लपलेल्या दरोडेखोरांना पोलिसांच्या सज्जतेची कल्पना आली होती. त्यामुळे काही वेळातच ते पोलिसांना शरण आले. संशयितांकडून गोळीबाराचा प्रयत्न झाला असता, तर त्यांचे एन्काऊंट करण्यास पोलीस सज्ज होते. परंतु, संशयित दरोडेखोर शरण आले आणि एन्काऊंटरचा प्रसंग टळला. परंतु, कराडचे एज्युकेशन हब असलेल्या विद्यानगरीतील रहिवाशांनी तीन तास थरार अनुभवला. तसेच 'शूट आऊट अॅट लोखंडवाला' चित्रपटाची आठवणही झाली.