महाबळेश्वर Horse Excrement Spreading Disease : महाराष्ट्राचे नंदनवन आणि थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिध्द असणार्या महाबळेश्वरच्या वेण्णा तलावातील घोड्यांच्या विष्ठेमुळं रोगराई पसरत असल्याचा धक्कादायक निष्कर्ष एका अभ्यासातून समोर आलाय. नागरिकांना अतिसार, अन्न विषबाधा, श्वसनाचा संसर्ग, बुरशीजन्य संसर्ग आणि टायफॉईड सारखे आजार होत असल्याचंही अहवालातून स्पष्ट झालंय.
अभ्यासातून रोगराईचा धक्कादायक निष्कर्ष : गोखले राज्यशास्त्र-अर्थशास्त्र संस्थेच्या सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंटनं (सीएसडी) यासंबंधी केलेल्या अभ्यासातून नागरिकांमध्ये वर्षानुवर्षे रोगराई पसरत असल्याचा निष्कर्ष समोर आलाय. या संस्थेच्या माध्यमातून आरोग्य जोखीम मूल्यांकन संशोधन प्रकल्प हाती घेण्यात आला होता. या प्रकल्पासाठी महाबळेश्वरची निवड करण्यात आली होती. या प्रकल्पांतर्गत करण्यात आलेल्या अभ्यासाअंती हा धक्कादायक अहवाल समोर आलाय. यामुळं पर्यटकांच्या आरोग्याचा प्रश्न प्रकर्षानं पुढं आलाय.
कोणत्या नमुन्यांचा केला अभ्यास : सीएसडी संस्थेच्या प्रा. डॉ. प्रीती मस्तकार यांच्या नेतृत्वाखाली निखिल अटक, दिशा सावंत, रोहिणी सातपुते, सूरज भोळे आणि विनीत दुपारे यांनी या प्रकल्पावर काम केलं. त्यांनी वेण्णा तलावातील पाण्यासह इतर सर्व जलस्रोत, जलशुद्धीकरण केंद्रे, घरे, व्यावसायिक आस्थापना आणि भूजल यांचे सखोल नमुने घेतले होते. त्या नमुन्यांमध्ये प्रदूषण आढळून आलं. यातून प्रदूषण आणि रोगराई पसरत असल्याची बाब समोर आल्यामुळं नंदनवनात खळबळ उडालीय.
मिनी काश्मीर म्हणून ओळख : महाबळेश्वर देशातील थंड हवेचं ठिकाण तसंच मिनी काश्मीर म्हणून प्रसिध्द आहे. महाबळेश्वरमधील विविध पॉईंट हे पर्यटकांचं खास आकर्षण आहेत. वर्षभर पर्यटकांची महाबळेश्वरमध्ये गर्दी असते. देशाच्या कानाकोपर्यातून येणार्या पर्यटकांमुळं स्थानिक बाजारपेठेत लाखोंची उलाढाल होते. स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार देखील मिळतो. सध्या रोगराईच्या संदर्भातील अहवाल समोर आल्यामुळं पर्यटकांची चिंता वाढलीय. स्वच्छ सर्वेक्षणात महाबळेश्वर गिरिस्थान नगरपालिकेला आता प्रदूषण आणि रोगराई निर्मुलनासाठी मोठ्या उपाययोजना कराव्या लागणार आहेत.
हेही वाचा :