सातारा - शिकारीच्या प्रयत्नात असलेल्या सात जणांना सातारा वनविभागाने मध्यरात्री थरारक पाठलाग करून पकडले. सातारा तालुक्यातील ठोसेघर, पांगारी, पळसावडे, कारी असा सुमारे तीन तास रात्रीच्या काळोखात हा पाठलाग सुरु होता. संशयितांकडून दांडकी, भाला, ३ शिकारी कुत्रे जप्त करण्यात आले.
गंगाराम रामचंद्र पांढरमिसे (रा. ठोसेघर), निलेश अशोक जिमन, प्रकाश शंकर जिमन , विकास शंकर जिमन, विश्वास शिवाजी किर्दत, दीपक मनोहर किर्दत व अनिल शंकर किर्दत (सर्व रा. कारी) अशी संशयितांची नावे आहेत.
वनक्षेत्रपाल श्रीमती शीतल राठोड मंगळवारी आपल्या सहकाऱ्यांसह ठोसेघर भागात रात्रगस्त घालत होत्या. मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास संशयावरून वनाधिकाऱ्यांनी संशयितांना हटकले. त्यावेळी त्यांनी दुचाकीवरुन पळ काढला. वनाधिकाऱ्यांनी पाठलाग केला. रात्री सुमारे तीन तास हा पाठशिवणीचा खेळ सुरू होता. एकास ठोसेघरमध्ये तर उर्वरीतांना कारी येथून ताब्यात घेण्यात आले.
शिकारीच्या उद्देशाने फिरत असल्याचे संशयितांनी कबुल केले. त्यांच्यावर वन्यजीव संरक्षण अधिनियम1972 व भारतीय वन अधिनियम 1927 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज न्यायालयाने संशयितांची प्रत्येकी ७ हजार रुपयांच्या बॉण्डवर मुक्तता केली.
ही कारवाई वनक्षेत्रपाल शीतल राठोड, वनपाल योगेश गावित, वनरक्षक राजकुमार मोसलगी, मारुती माने, रणजित काकडे, धनंजय लादे यांनी केली.