सातारा - कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव आणि सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर मुस्लीम बांधवांनी रमजान ईद शांतेत आणि सुरळीत पार पाडावी. मशीद व इतर सार्वजनिक ठिकाणी नमाज पठण न करता घरातच नमाज पठण करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी केले. पोलीस मुख्यालयात जिल्ह्यातील प्रमुख मुस्लीम मान्यवरांसमवेत सातपुते यांनी एक बैठक घेतली.
बैठकीच्या सुरुवातीला जिल्ह्यातील कोरोनाची सद्यस्थिती आणि प्रतिबंधात्मक आदेशांबाबत सर्व उपस्थितांना माहिती देण्यात आली. या पार्श्वभूमीवर रमजान ईद सण साजरा करताना संसर्गजन्य विषाणूचा प्रसार होऊ नये, यासाठी घ्यावयाची काळजी, सोशल डिस्टन्सिंगचे तंतोतंत पालन करणे, ईदगाह, मशीद या सार्वजनिक ठिकाणी नमाज पठण न करता घरातच नमाज पठण करावे, अशा सूचना देण्यात आल्या. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी जिल्ह्यातील सर्व मुस्लीम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छाही दिल्या.