सातारा - नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात साताऱ्यातही पडसाद उमटले आहेत. सीएए कायदा रद्द व्हावा याकरता मंगळवारी परिवर्तनवादी संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने केली.
'जमियत-उलेमा-ए-हिंद', बहुजन क्रांती मोर्चा, वंचित बहुजन आघाडी, परिवर्तन संघटना समन्वय समिती आदी संघटनांनी या मोर्चाचे आयोजन केले होते. हा कायदा रद्द करा व संविधान वाचवा अशी एकमुखी हाक या मोर्चाच्या निमित्ताने देण्यात आली.
हेही वाचा - दीपक केसरकरांच्या अभिनंदन ठरावावरून वैभव नाईक अन् नितेश राणेंमध्ये वाद
दुपारी अडीच वाजता गांधी मैदानावरुन मोर्चास प्रारंभ झाला. 'सीएए'च्या विरोधात मोर्चा दरम्यान जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या भव्य मोर्चात जवळपास दोन हजार नागरिक सहभागी झाले होते. मोर्चाच्या निमित्ताने मुस्लीम व बहुजन समाजाचा सीएए कायद्याच्या विरोधातील तीव्र असंतोष दिसून आला. मोर्चा राजपथावरून कमानी हौद, शेटे चौक, पोलीस मुख्यालय, पोवई नाकामार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर गेला. तेथे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात होता.
हेही वाचा - अंगणवाडीच्या निकृष्ठ कामामुळे चिमुकल्यांवर उघड्यावर बसण्याची वेळ