सातारा - एसटी कर्मचाऱ्यांचे नेतृत्व करणारे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना कोठडीची मुदत संपल्याने आज गिरगाव कोर्टात हजर करण्यात आले. साताऱ्यातील एका जुन्या गुन्ह्यात पोलिसांना सदावर्ते हवे असल्याने सातारा पोलीस सदावर्ते यांचा ताबा मागणार आहेत.
आज संपली कोठडी - एसटी कर्मचाऱ्यांचे नेतृत्व करणारे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना शुक्रवारी राहत्या घरातून गावदेवी पोलिसांनी अटक केली होती. शनिवारी त्यांना मुंबईतील किला कोर्टात हजर करण्यात आले होते. सदावर्ते यांची बाजू जयश्री पाटील आणि इतर दोन वकिलांनी मांडली होती. हा युक्तिवाद संपल्यानंतर न्यायालयाने गुणरत्न सदावर्ते यांना 11 एप्रिलपर्यंत दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. आज ही कोठडी संपत असून गुणरत्न सदावर्ते यांना गिरगाव कोर्टात हजर करण्यात आले.
आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी साताऱ्यात आहे गुन्हा - सातारा पोलीस देखील गिरगाव कोर्टात दाखल झाले. छत्रपतींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी अॅड. सदावर्तेंवर साताऱ्यात गुन्हा दाखल आहे. सातारा शहरचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर त्यांच्या पथकासह गिरगाव कोर्टात गेले आहेत. सातारा पोलिस सदावर्ते यांचा ताबा मागणार असल्याचे सांगण्यात आले.