सातारा - ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वातील स्पर्धक अभिजीत बिचुकले याला सातारा स्थानिक गुन्हे अन्वेशन विभागाने (एलसीबी) शुक्रवारी दुपारी चेक बाउंन्सस प्रकरणी मुंबईतून अटक केली. या कारवाईने बिग बॉसच्या शोसह सातार्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान, चेक बाउंन्स (धनादेश) प्रकरणात सातारा न्यायालयाने जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या नावे त्याचे अजामीनपत्र वॉरंट काढले होते. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
अभिजीत बिचुकले आणि या प्रकरणातील तक्रारदार अॅड. संदीप सुरेश संकपाळ यांची २०१५ मध्ये ओळख झाली होती. यानंतर बिचुकलेने संकपाळ यांचा सातार्यातील फ्लॅट भाड्याने घेतला. तसेच त्यांच्याकडून २८ हजार रुपये उसने घेतले. हे उसने पैसे घेतल्यानंतर काही कालावधीनंतर वकीलांनी ते पैसे परत मागितल्यानंतर बिचुकलेने त्यांना चेक दिला. मात्र, बँकेच्या खात्यामध्ये पैसे नसल्याने तो चेक बाउन्स झाला. यानंतर बिचुकले याने पैसे परत करतो, असे तक्रारदाराला तोंडी सांगितले. मात्र, पैसे परत केले नाही. त्यामुळे मिळत संकपाळ यांनी सातारा जिल्हा न्यायालयात याप्रकरणी तक्रार दाखल केली.
न्यायालयाने सुरूवातीला बिचुकले याला वेळोवेळी नोटीस काढून हजर राहण्याचे आदेश काढले. पण तो न्यायालयात हजर राहत नसल्याने तक्रारदार अॅड. संकपाळ यांनी न्यायाधीशांना अटक वॉरंट काढण्यासाठी अर्ज केला. ७ जूनला त्याबाबतची कार्यवाहीला सुरूवात झाल्यानंतर न्यायालयातून बिचुकले याच्याविरुध्द अजामीन पात्र अटक वॉरंट तयार करून पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांना तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश दिले. यानंतर बिग बॉसच्या घरातून बिचुकले याला सातारा एलसीबीने ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याला सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास सातारा येथे आणल्यानंतर मेडिकल चेकअपसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात नेले. रात्री उशिरा त्याला अटक दाखवून शहर पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये ठेवले. शनिवारी त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे.
कोण आहे अभिजीत बिचुकले?
अभिजीत बिचुकले स्वत:ला कवी मनाचा नेता म्हणवून घेतो. त्याने आतापर्यंत अनेक निवडणुका लढवल्या आहेत. नगरसेवकपदापासून ते देशाच्या राष्ट्रपतीपदापर्यंत त्याने अनेक निवडणुकींमध्ये आपला अर्ज दाखल केला आहे. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनाही त्याने अनेकदा आव्हान दिले आहे.