- ०७ : ०० - उदयनराजे भोसले विजयी
- ०५ : ०० - उदयन राजे भोसले १६ व्या फेरी अखेर १ लाख १६ हजार मतांनी आघाडीवर
- १:३६ - उदयनराजे ५५ हजार ३३९ मतांनी आघाडीवर
- १२:५७ - उदयनराजे ४० हजार मतांनी आघाडीवर
- १०:१५ - उदयनराजे भोसले ९ हजार मतांनी आघाडीवर
- ९:५२ - साताऱ्यात आतापर्यंत उदयनराजेंना २० हजार ३९६ तर नरेंद्र पाटील यांना १५ हजार ८८६ मते
- ९:२१ - उदयनराजे भोसले ८००० मतांनी आघाडीवर
- ८:५७ - उदयनराजे भोसले आघाडीवर
- ८:०० - सातारा लोकसभेच्या मतमोजणीला सुरूवात
सातारा - सातारा लोकसभेची मतमोजणी शहरातील डीएमओ गोडाऊन, एमआयडीसी याठिकाणी पार पडली आहे. या मतदार संघातून खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवत विजय संपादन केला. तर त्यांच्या विरोधात युतीकडून माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांना हार पत्करावी लागली.
सातारा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. या जिल्ह्यातील राजकारण फक्त व्यक्तीकेंद्रीत आहे. सामाजिक तसेच धार्मिकपणाचा कसलाही परिणाम या मतदार संघात होताना पाहायला मिळत नाही. जिल्ह्यात जिल्हा बँका, जिल्हा परिषद, पंचायत समिती यावर पूर्णपणे राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. स्थानिक स्वराज संस्था तसेच बाजार समित्यांमध्येही राष्ट्रवादीचा झेंडा आहे.
उदयनराजे भोसले हे १६ व्या लोकसभा निवडणुकीत खासदार म्हणून निवडून आले होते. साताऱ्यामध्ये उदयनराजे भोसले यांचेच चालते असे म्हटले जाते. उदयनराजे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे १३ वे वंशज आहेत. १९९६ साली त्यांनी लोकसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढवली होती. पण त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर भाजपच्या तिकीटावर विधानसभा निवडणूक जिंकून ते राज्यमंत्री झाले. १९९८-९९ च्या काळामध्ये ते राज्याचे महसूल राज्यमंत्री होते. भाजपला रामराम करत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पण काँग्रेसकडून तिकीट न मिळाल्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादीच्या तिकीटावर २००९ आणि २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ते विजयी झाले. तर २०१८ मध्ये उदयनराजे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चेला उधाण आले होते.
दुसऱ्या बाजूला माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांना भाजपने आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्षपद दिले. त्यानंतर त्यांनी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली होती. मात्र, हा मतदारसंघ शिवसेनेकडे गेल्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून आपली उमेदवारी मिळवली. काही दिवसांपूर्वी उदयनराजे भोसले यांचा गोडवा गाणारे पाटील त्यानंतर मात्र त्यांच्या विरोधात बोलताना दिसले.
या मतदार संघामध्ये एकूण ६ विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यात वाई, कोरेगाव, कराड दक्षिण, कराड उत्तर, पाटण, सातारा या तालुक्यांचा समावेश आहे. २०१४ मध्ये ५६.७९ टक्के मतदान झाले होते. तर यंदा ६०.३३ टक्के मतदान झाले आहे.