सातारा - निवडणुकीच्या रणधुमाळीतमध्ये चारा छावण्या सुरू करण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शेतकरी वर्गातून केला जात आहे. जिल्ह्यात सध्या म्हसवडमध्ये स्वयंसेवी संस्थेच्या वतीने एकमेव चारा छावणी सुरू आहे. तर इतरत्र ५० छावण्या सुरू होण्यासाठी विविध सोसायटी, बँका, संस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवले आहेत.
यंदाचा दुष्काळ जिल्ह्यातील पशुधनाच्या जीवावर बेतणारा ठरत आहे. दुष्काळाची दाहकता वाढत असून चाराटंचाई भासू लागली आहे. शेतकऱ्यांना जनावरांसाठी चारा विकत घ्यावा लागत आहे. सध्या साखर कारखाने सुरू असल्याने उसाचे वाडे मिळत आहे. मात्र, कारखान्याचा हंगाम संपला तर ते वाडे मिळणार नाही. माण-खटाव, कोरेगाव, खंडाळा, फलटण, वाई तालुक्यातील जनावरे दुष्काळामुळे हाल सुरू आहेत. ही संख्या तब्बल ४९ हजार ४५६ इतकी असल्याची प्रशासनाकडे नोंद आहे.
माण तालुक्यातील तब्बल ४७ तर खटाव तालुक्यातून ३ चारा छावण्या सुरू करण्यासाठी विविध विकास सेवा सोसायटी, बँका, धर्मादाय कार्यालयामार्फत नोंदणीकृत सामाजिक संस्थांनी जिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव सादर केले आहेत. त्या प्रस्तावाची तपासणी सुरू असल्याची माहिती जिल्हा पुरवठा विभागातून देण्यात आली.