सातारा- अकोला महापालिकेच्या उपायुक्त रंजना गगे यांनी मंगळवारी सातारा पालिकेच्या मुख्याधिकारीपदाचा पदभार घेतला. सुमारे पावणेदोनशे वर्षांच्या इतिहासात प्रथमच सातारा पालिका प्रशासनावर महिला अधिका-याची नियुक्ती झाली आहे.
कार्यकाल पुर्ण झाल्याने मुख्याधिकारी शंकर गोरे यांची बदली झाली आहे. त्यांच्या जागेवर श्रीमती गगे यांची नियुक्ती झाली आहे. शंकर गोरे पंढरपूर येथून जून २०१६ मध्ये साता-यात बदलून आले होते. त्यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ गेल्या वर्षीच पुर्ण झाला. मात्र लोकसभा, विधानसभेच्या निवडणूका व नंतर कोविडच्या परिस्थितीमुळे त्यांना साता-यात थांबावे लागले. शासनाने गट अ संवर्गातील अधिका-यांच्या बदल्या केल्याने त्यात गोरे यांची बदली झाली आहे.
मुळच्या नगरच्या असलेल्या श्रीमती गगे यांनी यापुर्वी मालवण, सर्जापूर, रत्नागिरी, कल्याण-डोंबिवली येथे काम केले आहे. ब्रिटीश काळात, १८५६ साली स्थापन झालेल्या सातारा पालिकेच्या प्रशासनपदाची धूरा प्रथमच महिला अधिका-याकडे सोपविण्यात आली आहे. त्यामुळे श्रीमती गगे यांच्या नेमणुकीला विशेष महत्व आहे.
रंजना गगे यांनी मंगळवारी सातारा पालिकेच्या मुख्याधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारल्याने पालिकेत महिलराज निर्माण झाले आहे. सातारा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदावर माधवी कदम या कार्यरत आहेत.