सातारा - गेल्या काही दिवसांपासून उसंत घेतलेल्या पावसाने कोयना धरणातंर्गत विभागासह तालुक्यातील बहुतांशी ठिकाणी आज (शनिवार) पुन्हा सुरूवात केली. बेंदूर सणाच्या दिवशी पावसाने दमदार सुरूवात केल्याने बळीराजा सुखावला आहे. तर कोयना धरणात सध्या प्रतिसेकंद सरासरी 2 हजार 558 क्युसेक पाण्याची आवक होत आहे. त्याचवेळी धरण पायथा वीजगृहातील दोन जनित्राद्वारे वीजनिर्मिती करून प्रतिसेकंद पूर्वेकडे कोयना नदीपात्रात सिंचनासाठी 2 हजार 111 क्युसेक्स पाणी सोडण्यात येत आहे.
शुक्रवारपासूनच तालुक्यात पावसाने सुरूवात केली आहे. धरणात आता एकूण पाणीसाठा 32.03 टीएमसी इतका झाला असून, त्यापैकी उपयुक्त साठा 27.03 टीएमसी आहे. पाण्याची उंची 2080.4 फूट, जलपातळी 634.08 मीटर इतकी झाली आहे. धरणातंर्गत विभागातील कोयना, नवजा, महाबळेश्वर आदी बहुतांशी ठिकाणी आता अपेक्षीत पाऊस पडत असल्याने धरणात येणाऱ्या पाण्याचे प्रमाणही हळूहळू वाढत चालले आहे. सध्या कोयना धरणात प्रतिसेकंद सरासरी 2 हजार 558 क्युसेक पाण्याची आवक होत असून, त्यात झपाट्याने वाढ होत आहे. त्याचवेळी धरण पायथा वीजगृहातील दोन जनित्राद्वारे वीजनिर्मिती करून प्रतिसेकंद पूर्वेकडे सिंचनासाठी कोयना नदीपात्रात 2 हजार 111 क्युसेक्स पाणी सोडण्यात येत आहे.
गेल्या चोवीस तासांतील पावसाची नोंद
कोयना 42 मिली मीटर (881), नवजा 48 (985), तर महाबळेश्वर येथे 78 मिलीमीटर (886) मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यातील दुर्गम ठिकाणी वसलेल्या आणि सर्वात जास्त पावसाची नोंद होणाऱ्या पाथरपुंज येथे 63 (1440) मिलीमीटर पाऊस पडला आहे. तसेच कोयना पाणलोट क्षेत्रातील अतिपर्जन्यवृष्टी होत असलेल्या पर्जन्यमापन केंद्रातील प्रतापगड येथे 84 मिली मीटर (790), सोनाट 36 (729), वळवण 89 (1311), बामणोली 40 (669) मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे.