सातारा - फायनान्स कंपन्यांकडून सक्तीने सुरू असलेली कर्जवसुली आणि चेक बाऊन्स चार्जेसची आकारणी थांबवावी. अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू, असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष अजित बानगुडे यांनी दिला आहे. यासंदर्भात कराडचे प्रांताधिकारी उत्तम दिघे यांना निवेदनही देण्यात आले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशासह राज्यभरात लॉकडाऊन करण्यात आले. या लॉकडाऊनमुळे सर्वच क्षेत्रातील लोक अर्थिक अडचणीत आले आहेत. यामुळे अनेक लोकांच्या नोकऱ्यांवर गदा आली. तर, बहुतेक लोकांचे पगार होत नसल्याने सरकारने मार्च ते ऑगस्ट या सहा महिन्यांचे कर्जाचे हप्ते वसूल करू नये, अशा सूचना सर्व बँक, फायनान्स कंपन्यांना दिल्या आहेत. तरीही फायनान्स कंपन्या सक्तीने वसुली करत आहेत. हफ्ता भरला नाही, तर चेक बाऊन्स चार्जेसच्या नावाखाली बेसुमार दंड आकारला जात आहे. हे प्रकार न थांबल्यास तीव्र आंदोलन करणार असल्याचे प्रहार जनशक्ती पक्षाने निवेदनात म्हटले आहे.