सातारा - केंद्र सरकाने लागू केलेल्या सीएए आणि एनआरसी कायद्याविरोधात देशासह राज्यात आंदोलने सुरू आहेत. या कायद्याविरोधात जिल्ह्यातील पाटणमध्येही बंद पाळण्यात आला. या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. यावेळी सर्वधर्मियांनी एकत्रित येऊन रामापूरपासून (पाटण) तहसीलदार कार्यालयपरंयत मुकमोर्चा काढला.
एका बाजूला पाटण बंदची हाक तर दुसरीकडे व्यापारीवर्गाने दुकाने सुरू ठेवण्याबाबत निवेदन सादर केल्याने पाटण शहरात बंदबाबत नागरीक व व्यापारी वर्गात संभ्रमावस्था पाहायला मिळाली. नागरिकत्व दुरुस्ती कायदा व नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझन (एनआरसी) कायद्याविरोधात बुधवारी सर्वधर्मिय एकत्रित आले होते. सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास रामापूर याठिकाणी सर्वधर्मीय बांधव एकत्रित आल्यानंतर 'एनआरसी हटाव संविधान बचाव, नो एनआरसी, नो सीएए' असे फलक घेवून रामापूर चौक, झेंडा चौक, लायब्ररी चौकमार्गे तहसील कार्यालय असा मुकमोर्चा काढण्यात आला. तहसील कार्यालयासमोर मोर्चा आल्यानंतर त्याठिकाणी अनेकांनी या कायद्याविरोधात संताप व्यक्त करत आपला विरोध दर्शविला.
यावेळी बोलताना सत्यजितसिंह पाटणकर म्हणाले, की संविधानाप्रमाणे भारतात कोणालाही कुठेही लिंग, भाषा, प्रांत, जन्मस्थळ, धर्म व जातीच्या आधारावर भेदभाव करता येत नाही. केंद्र सरकारने पारीत केलेला हा कायदा भारतातील सर्वसामान्यांना त्रास देणारा आहे. त्यामुळे याला विरोध होणे अपेक्षीतच आहे. पाटण शहराचा विचार केला तर आजपर्यंत कधीही हिंदू-मुस्लिम असा तेढ निर्माण झाला नाही. येथून पुढेही होणार नाही. सणासुदीला सर्व धर्मातील लोक एकत्रित येवून गुण्यागोविंदाने सण, उत्सव साजरा करतात. त्यामुळे संविधान वाचविताना कोणतीही तडजोड नको, असेही पाटणकर म्हणाले.