सातारा: राज्याचे पणन सहसंचालक शशिकांत पतंगराव घोरपडे हे बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेची नोंद शिरवळ (जि. सातारा) पोलीस ठाण्यात झाली आहे. दरम्यान, त्यांनी भोर तालुक्यातील सारोळा येथे नीरा नदीमध्ये उडी मारल्याच्या संशयावरून नीरा नदीपात्रात युद्धपातळीवर शोध कार्य सुरू करण्यात आले आहे. वरिष्ठ अधिकारी देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत.
मित्राची कार घेऊन ऑफिसला गेले शशिकांत घोरपडे हे मित्र प्रदिप मोहिते यांच्या कारमधून (एम. एच. ११ सी. डब्ल्यू. ४२४४) पुण्यातील कार्यालयात गेले होते. नेहमी कार्यालयातून ते साडेपाच वाजण्याच्या सुमारास घरी येत असतं. मात्र, उशिरपर्यत ते घरी न आल्याने आणि त्यांचा मोबाईल बंद असल्याने त्यांच्या पत्नीने शशिकांत यांच्या बंधूंना याबाबतची कल्पना दिली. त्यांनी कार्यालयात चौकशी केली असता, शशिकांत हे 3:30 वाजण्याच्या दरम्यान कार्यालयातून गेल्याची माहिती मिळाली.
मित्राच्या मोबाईलवर फास्ट टॅगचा मेसेज शशिकांत घोरपडे यांचे मित्र प्रदिप मोहिते यांच्या मोबाईलवर खेड- शिवापूर टोलनाक्यावरुन कार गेल्याचे फास्ट टॅगचा मॅसेज आल्याने ते साताऱ्याकडे गेल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानंतर नातेवाईकांनी शोधाशोध सुरु केली. दरम्यान, शिदेंवाडी गावच्या हद्दीतील एका कंपनीसमोर कार आढळून आली. तसेच तेथील हॉटेलमध्ये चहा पिल्याची माहितीही मिळाली. मात्र, त्यांचा ठावठिकाणा न लागल्याने श्रीकांत घोरपडे यांनी शशिकांत घोरपडे बेपत्ता झाल्याची तक्रार शिरवळ पोलीस ठाण्यात दिली आहे.
नदीत उडी मारल्याच्या संशयावरून शोध सुरू एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये हॉटेलपासून एक व्यक्ती चालत पूलाकडे जात असल्याचे दिसून आले आहे. मात्र, नदीपात्रात नेमकी कोणी उडी मारली, हे फुटेजवरून स्पष्ट होत नाही. त्यामुळे संशयावरून नीरा नदीपात्रात शोधकार्य सुरू करण्यात आले आहे. घटनास्थळी बेपत्ता अधिकाऱ्याचे नातेवाईक, पोलीस दाखल झाले आहेत. महाबळेश्वर ट्रेकर्स, शिरवळ रेस्क्यू टीम, भोर आपत्ती व्यवस्थापनच्या जलआपत्ती पथकामार्फत नीरा नदीपात्रात शोध घेण्यात येत आहे.