(सातारा) कराड - येथील स्वातंत्र्य सेनानी दादा उंडाळकर स्मारक समितीच्यावतीने दिला जाणारा 'स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार' पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांना जाहीर झाला आहे. (Dada Undalkar Social Award 2022 ) उंडाळे येथे शुक्रवारी (दि. 18 फेब्रुवारी) रोजी होणार्या स्वातंत्र्य सैनिक अधिवेशन व माजी सैनिक मेळाव्यात या पुरस्काराचे वितरण होणार आहे. ५१ हजार रूपये रोख, स्मृतीचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
दादा उंडाळकरांचा ४८ वा स्मृतीदिन
स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर यांचा शुक्रवार, दि. १८ रोजी ४८ वा स्मृतीदिन आहे. स्मृतीदिनानिमित्त प्रतिवर्षी उंडाळे येथे समाज प्रबोधन साहित्य संमेलन, कवी संमेलन, स्वातंत्र्य संग्राम सैनिक अधिवेशन आणि स्वातंत्र्य सैनिक मेळावा, अशा तीन दिवसीय कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मात्र, यंदा कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केवळ एक दिवसीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. उंडाळे (ता. कराड) येथे शुक्रवारी होणार्या स्वातंत्र्य संग्राम सैनिक अधिवेशन व माजी सैनिक मेळाव्यात माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते डॉ. प्रतापसिंह जाधव यांना पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. (Padma Shri Dr. Pratap Singh Jadhav Announced) दादा उंडाळकर स्मारक समितीचे विश्वस्त व रयत कारखान्याचे चेअरमन अॅड. उदयसिंह पाटील, व्यवस्थापकीय विश्वस्त प्रा. गणपतराव कणसे, कराड तालुका खरेदी-विक्री संघाचे चेअरमन वसंतराव जगदाळे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
पद्मश्री प्रतापसिंह जाधव यांचे सामाजिक कार्य
पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी वृत्तपत्राच्या माध्यमातून तसेच सामाजिक चळवळींमध्ये सक्रिय सहभाग घेऊन अनेक आंदोलनांचे नेतृत्व केले. राजर्षी छत्रपती शाहू महाराज जन्मशताब्दीचे आयोजन, सियाचिनमध्ये जवानांसाठी हॉस्पिटलची उभारणी त्यांनी केली. मराठा आरक्षण, ऊसदर, दूध दरवाढ आंदोलन, टोलविरोधी आंदोलन तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठासाठीच्या आंदोलनात देखील पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांचा पुढाकार राहिला आहे.
दादा उंडाळकर पुरस्काराचे आतापर्यंतचे मानकरी
स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर सामाजिक पुरस्काराने आत्तापर्यंत विविध क्षेत्रातील मान्यवरांना सन्मानित करण्यात आले आहे. त्यामध्ये स्वातंत्र्य सेनानी, माजी राजदूत ना. ग. गोरे, कवी ना. धो. महानोर, स्वातंत्र्य सेनानी उषा मेहता, स्वातंत्र्य सैनिक गोविंदभाई श्रॉफ, सामाजिक कार्यकर्त्या नीलमताई देशपांडे, मोहन धारीया, ग. प्र. प्रधान, शास्त्रज्ञ डॉ. वसंतराव गोवारीकर, अण्णा हजारे, शांताराम गरूड, प्राचार्य पी. बी. पाटील, स्वा. सै. प्रभाकर कुंटे, न्यायमूर्ती पी. बी. सावंत, कृषीतज्न डॉ. जयंत पाटील, पत्रकार पी. साईनाथ, अॅड. उज्ज्वल निकम, डॉ. अभय बंग, डॉ. तात्याराव लहाने, नाबार्डचे माजी अध्यक्ष यशवंतराव थोरात, अर्थतज्ज्ञ निळकंठ रथ, डॉ. सदानंद मोरे, डॉ. प्रकाश आमटे, स्वातंत्र्य सेनानी भाई वैद्य, पद्मश्री डॉ. गणेश देवी यांच्यासह अनेक मान्यवरांचा समावेश आहे. या पुरस्काराच्या कार्यक्रमासाठी देश पातळीवरील दिग्गजांनी उंडाळे येथे हजेरी लावली आहे.
हेही वाचा - The Car Caught Fire : कोल्हापूर शहरात मुख्य रस्त्यावर बर्निंग कारने घेतला पेट