सातारा - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शिवस्वराज्य यात्रा रात्री साताऱ्यात आली. सातारा येथे झालेल्या सभेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपात गेलेल्या आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर जोरदार टीका केली. 'वारे बदलल्यावर पक्ष बदलणारे पुन्हा माघारी पक्षात येऊ शकतात. कोणतेही संकट येऊ नये, म्हणून काही जण पक्ष बदलतात. ज्यांच्यात लढण्याची ताकद, मानसिकता नाही, जे कायम घड्याळ्याच्या चिन्हावर निवडून आले त्यांनी पक्ष बदलावा? मंत्रिपदाच्या तुकड्यासाठी ते भाजपवासी झाले,' असे पाटील म्हणाले.
'निवडणुकांमध्ये (भाजपला) विजय मिळालाच तर, मंत्रीपद देण्याआधी दिल्लीहून फतवा येईल. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून आलेल्या सर्वांच्या निष्ठा तपासून पहा. हे होईपर्यंत त्यांना मंत्रीपद देऊ नका. मग काय करतील शिवेंद्रराजे?' असा टोला जयंत पाटील यांनी शिवेंद्रराजेंना लगावला. 'राष्ट्रवादी पक्षाने शिवेंद्रराजेंना कायम आपुलकीची वागणूक दिली. त्यांना अगदी काटा टोचला तरी शरद पवार साहेबांचा आपुलकीने फोन यायचा. आता असा आपुलकीचा भाजपमधून फोन येईल का? आम्ही आजवर कोणाला मुजरा करायला गेलो नाही,' असे सांगत त्यांना येणारी निवडणूक जड जाईल असा इशारा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिला.