सातारा - कोरेगाव तालुक्यातील शनी मंदिराचे मठाधिपती नंदगिरी महाराजांवर विनयभंग केल्याप्रकरणी वाठार पोलीस ठाण्यात एका महिलेने गुन्हा दाखल केला आहे. नंदगिरी महाराजांना अद्यापही अटक न झाल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त केला जात आहे.
मुलांच्या भांडणाबाबत एक महिला महाराजांसोबत बोलण्यासाठी सोळशी येथील मठात गेली होती. ती तेथून परत असताना महाराजांचा आशीर्वाद घेण्यासाठी खाली वाकली. मात्र महाराजांनी वाईट हेतूने त्या महिलेला पकडले. महाराज एवढ्यावरच न थांबता महिलेला शरीर सुखाची मागणी देखील केली. महिलेने महाराजांच्या हाताला हिसका देऊन तेथून पळ काढला. त्यानंतर महिलेने याबाबत वाठार पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी नंदगिरी महाराजांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार त्या महाराजाला अटक करण्यासाठी पोलिसांनी सोळशी मठ गाठले. परंतू महाराज मठामध्ये नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांच्या कार्यपद्धतीवर संशय...
नंदगिरी महाराज मठात असल्याची माहिती त्यांनी माध्यमांना दिली आहे. मात्र पोलिसांना सोळशी मठात महाराजाचा शोध घेण्यात अपयश आले. त्यामुळे पोलिसांनी नक्की मठाची झडती घेतली काय, हा प्रश्न येथे निर्माण होतो. मागील आठवड्यात देखील सागर खोत याला वाचवण्यासाठी पोलिसांनी त्याला मदत केली असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनावर नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.