कराड (सातारा) - ओढ्याचा नैसर्गिक प्रवाह बदलल्याने वळीवाच्या पावसाचे पाणी सातार्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या गोटे (कराड) येथील निवासस्थानात शिरल्याने त्यांच्या निवासस्थानाचा परिसर जलमय होऊन गेला. कराडचे तहसीलदार अमरदीप वाकडे यांना याबाबतची माहिती मिळताच त्यांनी तातडीने खासदारांचे निवासस्थान गाठले. ही परिस्थिती का ओढवली यांचे माहिती घेऊन कारवाई करण्याची सूचना त्यांनी महसूल कर्मचार्यांना केली आहे.
...म्हणून पाणी शिरले
कराडसह ग्रामीण भागात मंगळवारी आणि बुधवारी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. पावसामुळे सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. महामार्गाच्या दोन्ही बाजूच्या पादचारी मार्गाला तळ्याचे स्वरूप आले. यातच खासदार श्रीनिवास पाटील यांचे निवासस्थान असलेल्या गोटे (ता. कराड) येथील निवासस्थानाचा परिसरही जलमय झाला. खासदार पाटील यांच्या घरापासून काही अंतरावर एका राजकीय कार्यकर्ता असलेल्या बिल्डरने मोठ्या इमारतीचे काम सुरू केले आहे. तेथून वाहणार्या ओढ्याचा नैसर्गिक प्रवाह बदलला गेल्यामुळे पावसाचे पाणी खासदार श्रीनिवास पाटील यांच्या बंगल्यात शिरले. त्यामुळे निवासस्थानाचा संपूर्ण परिसर जलमय झाला. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार अमरदीप वाकडे तातडीने खासदारांच्या निवासस्थानी दाखल झाले. त्यांनी परिस्थितीची पाहणी केली. ओढ्यावरील अतिक्रमणाची चौकशी करुन कारवाई करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. तसेच ओढ्याचा नैसर्गिक प्रवाह पूर्ववत करण्याच्या सूचनाही त्यांनी मंडल अधिकारी आणि तलाठ्यांना दिल्या आहेत.
शिवारातही जलमय
चोवीस तासात कराड तालुक्यात 246 मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे, तर बुधवारी रात्री देखील जोरदार पाऊस झाला आहे. या पावसामुळे कराडच्या सखल भागात सलग दुसर्या दिवशी पाणी साचल्याचे पहायला मिळाले. बुधवारी रात्री साडे आठपासून अकरापर्यंत पाऊस कोसळत होता. त्यामुळे कराड परिसरातील सर्व रस्ते निर्मनुष्य होते. ग्रामीण भागात रात्री उशीरा पावसाला सुरूवात झाली. सलग दोन दिवस झालेल्या पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचले आहे.
हेही वाचा-अखेर गोवा बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द, असा जाहीर केला जाईल निकाल