सातारा - 'दबाव वाढल्याने फडणवीसांनी आरक्षण देण्याचा प्रयत्न केला. मात्र ते आरक्षण न्यायालयात टिकले नाही. मराठा समाजाला आरक्षण देताना राष्ट्रपतींची मंजुरी का घेतली गेली नाही, असा पलटवार राष्ट्रवादीचे प्रतोद आमदार शशिकांत शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेत खासदार उदयनराजेंवर केला. 'फडणवीसांना मुख्यमंत्री करा, आरक्षणाचा प्रश्न मिटवतो' हे उदयनराजेंचे म्हणणे हास्यास्पद असल्याची टिकाही त्यांनी केली.
आमदार शशिकांत शिंदे म्हणाले, 'खासदार उदयनराजे यांनी ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्यासह राज्यातील ज्येष्ठांवर मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन केलेले आरोप चुकीचे आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर राज्य सरकार ठाम असून सर्वोच्च न्यायालयात सरकार भक्कमपणे बाजू मांडत आहे.
हेही वाचा-मराठा आरक्षण प्रश्न लोंबकळत राहिला याला जबाबदार कोण - उदयनराजे भोसले
भाजपचा कुटील डाव-
आरक्षणावरुन राज्यात अस्थिरता निर्माण करण्याचा कुटील डाव भाजपने खेळला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही सर्वपक्षियांची भावना आहे. मात्र, लोकांमध्ये बुद्धीभेद करून समाजात अस्थिरता निर्माण करण्यासाठी भाजपचे देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, उदयनराजे भोसले राज्य सरकारवर आरोप करत आहेत.
जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न-
मराठा आरक्षण संदर्भात सरकारला दोष देण्याशिवाय भाजपचे नेते काहीच करताना दिसत नाहीत. मराठा समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न होत आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा पुढे करून जातीय तेढ निर्माण करण्याचा डाव खेळला जात असल्याचा आरोप आमदार शिंदे यांनी केला.
आरक्षण प्रश्नात केंद्राने लक्ष घालावे-
वास्तविक राज्य सरकार मराठा आरक्षणाच्या बाजूने आहे. न्यायालयातही भक्कमपणे बाजू मांडण्यात येत आहे. सर्वोच्च न्यायालयात अर्णव गोस्वामीसाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. तर मराठा आरक्षणाच्या प्रश्नीही सर्वोच्च न्यायालयाला केंद्र सरकारने सूचना कराव्यात. त्यासाठी राज्यातील भाजपा नेत्यांनी केंद्र सरकारवर दबाव आणावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
सातारा पालिकेत राष्ट्रवादीचे पॅनेल
सातारा पालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वतंत्र पॅनेल निश्चितपणे टाकणार आहे. महाविकास आघाडीचा फॉर्म्युला पालिकेत निवडणुकीत राबवण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवरून झाला तर तसाही निर्णय घेण्यात येईल. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक राजकार विरहित ठेवण्याचा सर्वांचाच प्रयत्न आहे, असे सूचक विधानदेखील आमदार शिंदे यांनी केले.
हेही वाचा-...तर राजेंनी मराठा आरक्षणासाठी मोदी सरकारला सांगून आदेश द्यायला सांगावे- नवाब मलिक
काय म्हणाले होते उदयनराजे?
४०-५९ वर्षे राजकीय नेतृत्व करणाऱ्या व मराठा समाजाचे नेतृत्व म्हणुन ओळखल्या जाणारांनी मराठा आरक्षणाच्या विषयावर इतकी वर्षे काय केले. मंडल आयोग शिफारशी लागू करण्याच्यावेळी सत्ताधा-यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा का सोडवला नाही, असे प्रश्न उपस्थित करत खासदार उदयनराजे भोसले यांनी शरद पवार यांचे नाव न घेता घाणाघाती टिका केली.