सातारा - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे सत्ता नसल्याने विकास होत नाही. पक्षात अन्याय होतोय, असे सांगून काही नेते मंडळी ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या वाटेवर गेली आहेत. ही त्यांची भुमिका स्वार्थीपणाची आहे. त्यांना या निवडणुकीत सर्वसामान्य जनता त्यांची जागा दाखवेल. त्यामुळे आगामी काळाता पवार साहेबांवर निष्ठा दाखवणाऱ्या प्रमाणिक व तरूण कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पक्षाची नव्या दमाने उभारणी केली जाईल, असा विश्वास राष्ट्रवादीचे पक्ष प्रतोद आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केला.
साताऱ्याचा बालेकिल्ला भाजपकडून पोखरण्याचा प्रयत्न केल्यास येथील राष्ट्रवादीचे निष्ठावंत एकत्रितपणे जशास तसे उत्तर देत बालेकिल्ला अबाधित राखतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच राष्ट्रवादीतील निष्ठावंतांनी भाजपचा रस्ता धरल्याने पक्षातील पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांत अस्वस्थतेची लाट पसरली आहे. आता पक्षाचे काय होणार या चिंतेने सर्वांना ग्रासले आहे. यावरती आमदार शशिकांत शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना निष्ठेने व एकत्रितपणे भाजपच्या रणनितीचा सामना करण्याचे आवाहन केले आहे.
ते म्हणाले, राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये गेली 20 वर्षे पक्षात राहून पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या छत्रछायेखाली राहून सत्ता असताना विविध पदे, मंत्रीपदे अनेकांनी भोगली. आता पक्षाची सत्ता नाही, हे कारण करून विकास कामे होऊ शकत नाहीत. राष्ट्रवादीत आपल्यावर अन्याय होते, असे सांगून काही दिग्गज नेते मंडळी निवडुणकीच्या तोंडावर भाजपच्या वाटेवर गेली आहेत. राष्ट्रवादीकडे सत्ता नाही म्हणून पक्ष सोडून जाणारे खरे स्वार्थी आहेत. त्यांना या निवडणुकीत सर्वसामान्य जनता त्यांची जागा दाखवेल. राष्ट्रवादीचे सर्व नेते, कार्यकर्ते एकत्रितपणे त्यांच्याविरोधात लढा देऊन बालेकिल्ला अबाधित ठेऊन दाखवतील. पुन्हा एकदा कै. यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या मागे जिल्हा उभा आहे, हे दाखवून देतील, असे मत त्यांनी व्यक्त केला आहे.