कराड (सातारा) - गेल्या निवडणुकीत सहकार पॅनेलने सभासदांना प्रतिशेअर दरवर्षी 60 किलो साखर देण्याचे आश्वासन दिले होते. ते आम्ही पूर्ण केले असून सभासदांना मोफत साखर देणारा कृष्णा कारखाना देशात एकमेव असेल, असे कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी म्हटले आहे. जयवंतराव भोसले सहकार पॅनेलच्या प्रचार दौर्यात ते बोलत होते.
डॉ. सुरेश भोसले पुढे म्हणाले, गेल्या सहा वर्षात आम्ही शेतकर्यांच्या उसाला 3000 रुपये इतका दर दिला आहे. आम्ही पारदर्शक व नियोजनबद्ध कारभार केला आहे. कृष्णा कारखाना एक कुटुंब आहे, या विचाराने काम आम्ही केले. येत्या काळातही कृष्णा कारखाना शेतकरी सभासदांच्या हिताचे उपक्रम राबविणार आहे. कारखान्याची गाळप क्षमता प्रतिदिन 12 हजार मेट्रिक टनापर्यंत वाढविण्याचा आमचा मानस आहे. विरोधकांचे एकत्रीकरणाचा प्रयत्न हा सभासदांच्या हितासाठी नव्हे, तर सत्ता आणि पैशासाठी चालला होता. हेतू शुध्द नसल्यामुळे एकत्रिकरणात जसे अपयश आले त्याप्रमाणे निवडणुकीतसुध्दा विरोधकांना अपयश येणार आहे. कारण, सभासदांनी सहकार पॅनेलच्या सभासद हिताच्या कारभारावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे या निवडणुकीत सहकार पॅनेललाच सभासदांचा पाठिंबा असल्याचा विश्वास डॉ. भोसले यांनी व्यक्त केला. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष जगदीश जगताप, उमेदवार सयाजी यादव, बबनराव शिंदे, माजी संचालक श्रीरंग देसाई, अजित खबाले, हेमंत पाटील उपस्थित होते.