सातारा - थकित वीजबिलामुळे उंडाळे भागातील शेतकर्यांना वाकुर्डे योजनेच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत होते. अशा परिस्थितीत कृष्णा कारखान्याने पुढाकार घेऊन थकीत वीजबिलाचा 4 लाख 29 हजार रुपयांचा धनादेश वाकुर्डे योजनेच्या अधिकार्यांकडे सुपूर्द केला. त्यामुळे, उंडाळे परिसरातील पिकांना वाकुर्डे योजनेच्या पाण्याचा लाभ मिळणार आहे. कृष्णा कारखान्याने आजअखेर वीजबिलाची 15 लाख 80 हजार 554 रुपये एवढी थकित रक्कम भरून शेतकर्यांना दिलासा दिला आहे.
हेही वाचा - तरूणाकडून घातक शस्त्रांसह एअरगन जप्त
कराड तालुक्यातील काले, ओंड, ओंडोशी, नांदगाव, मनव, उंडाळे, शेवाळवाडी, जिंती, टाळगाव, घोगाव, येणपे, वाठार, झुजारवाडी, पवारवाडी, चोरमारवाडी, माटेकरवाडी, येळगाव, गोटेवाडी, म्हारूगडेवाडी, आकाईवाडी, साळशिरंबे या गावांतील शेतकर्यांना वाकुर्डे योजनेच्या माध्यमातून शेतीच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. या योजनेचे वीजबिल थकीत होते. शेतकर्यांचे हीत लक्षात घेऊन कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी थकीत वीजबिलाची रक्कम भरण्याचा निर्णय घेतला.
पहिल्या टप्प्यात 8 लाख 19 हजार आणि दुसर्या टप्प्यात 3 लाख 31 हजार 922 रुपये कृष्णा कारखान्याने भरले होते. उर्वरित 4 लाख 29 हजार रुपयांचा धनादेश बुधवारी वाकुर्डे योजनेच्या अधिकार्यांकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी कारखान्याचे व्हा. चेअरमन जगदीश जगताप, संचालक दयानंद पाटील, धोंडिराम जाधव, कृष्णा सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, बळीराजा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष पंजाबराव पाटील, कोयना वसाहतीचे सरपंच राजेंद्र पाटील, बंटी जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. थकित वीजबिल भरल्यामुळे उंडाळे परिसरातील शेतीला वाकुर्डे योजनेचे पाणी पुन्हा मिळणार आहे.
हेही वाचा - कराड रेल्वे स्थानकात ओव्हरहेड वायरला लोंबकळत मनोरुग्णाची स्टंटबाजी