सातारा- कौन बनेगा करोडपती लॉटरीमध्ये २५ लाखांची लॉटरी लागल्याचे सांगत फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे. 25 लाखांचे बक्षीस आणि आलिशान कार बक्षीस लागल्याची बतावणी करून शाहूपुरीतील दाम्पत्यास दोन जणांनी तब्बल १७ लाख ३७ हजार रुपयांना लुटले आहे. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नारायण राजेंद्र सांभारे यांना व त्यांच्या पत्नी राजेश्वरी यांच्या स्मार्टफोनवर दोन अज्ञात नंबरवरून व्हॉटस्अॅप मेसेज आले. त्या संशयीतांनी सरदार हरजितसिंह (केबीसी लॉटरी मॅनेजर) आणि राणा प्रताप सिंह (बँक मॅनेजर) अशी नावे असल्याचे सांगितले. या दोघांनी दाम्पत्याला तुम्हाला कौन बनेगा करोडपती लॉटरीमध्ये २५ लाखांची लॉटरी आणि आलिशान कार बक्षीस मिळाल्याचे खोटे मेसेज, फोटो ऑडिओ मेसेज पाठवले. तसेच लॉटरी व इंडियन करन्सीमधील डिफ्रन्स टॅक्स अशी वेगवेगळी कारणे सांगून सांभारे दाम्पत्याला स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये वेळोवेळी पैसे भरण्यास भाग पाडले.
स्टेट बँकेच्या तब्बल ९ खात्यांवर सांभारे दाम्पत्याने एकूण १७ लाख ३७ हजार ९९० रुपये जमा केले. बक्षिसाची रक्कम व कार जमा न करता मॅनेजर असल्याची बतावणी करणारे आपल्याला फसवत असल्याचे लक्षात आल्यानंतर सांभारे यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. त्यानुसार माहिती तंत्रज्ञान अधिनियमानुसार संबंधितावर गुन्हा दाखल झाला आहे.