सातारा - दागिने लुटणाऱ्या सराईत टोळीचा शिरवळ पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. दोन आरोपींनी खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील बाजार पेठेमध्ये ७५ वर्षीय वृद्धेच्या घरात घुसून तूप विकण्याचा बनाव केला. त्यानंतर वृद्धेच्या गळ्यातील सोन्याची पोत व गंठण लंपास केले. याप्रकरणी, दोन सराईत चोरट्यांना शिरवळ पोलिसांनी अटक केली.
अटक केलेल्या आरोपींकडून विविध गुन्हे उघड झाले आहेत. सर्व गुन्ह्यांतील एकूण ४ लाख ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गुन्हेगार अनिल रघुनाथ बिरदवडे (वय ३१), अशोक नामदेव गंगावणे (वय ३०) बारामती तालुक्यातील बांदलवाडी येथील आहेत.
बहाणा करून घरात शिरले-
शिरवळ येथे मालन रामचंद्र गायकवाड (वय ७५) या वयोवृद्ध महिलेच्या घरात अनिल बिरदवडे व अशोक गंगावणे शिरले. त्यांनी बहाणा करत ३० हजार रुपये किमतीचे ११ ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण, १५ हजार रुपये किमतीची ६ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत, असा ४५ हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने काढून घेतला. त्यानंतर महिलेला मारहाण करून घटनास्थळावरून ते पसार झाले, अशी माहिती शिरवळ पोलिसांनी दिली.
थरारक पाठलाग करुन पकडले-
शिरवळ पोलिसांना चोरीची माहिती मिळताच विविध ठिकाणी नाकाबंदी करत शोधमोहीम राबविण्यात आली. पंढरपूर फाटा येथे नाकाबंदी दरम्यान विनानंबर प्लेटची संशयित दुचाकी व त्यावर मिळत्या जुळत्या वर्णनाच्या दोन व्यक्ती आढळल्या. पोलिसांनी दुचाकी थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, नाकाबंदी तोडत दुचाकीस्वार लोणंदकडे पळाले. पोलीस निरीक्षक उमेश हजारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी थरारक पाठलाग करत वीर धरण परिसरातील माने कॉलनीलगत संशयितांना जेरबंद केले.
अनेक गुन्ह्यांची कबुली-
आरोपींवर पुणे आणि सातारा जिल्ह्यांतील विविध पोलीस ठाण्यांमध्ये जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. यामध्ये चाकण, शिक्रापूर, वडगाव निंबाळकर, बारामती या ठिकाणाचा समावेश आहे. त्यांनी शिरवळ गावातील महिलेच्या गळ्यातील ऐवज चोरल्याचे व मुद्देमाल लपवून ठेवल्याचे सांगितले. त्यानुसार संबधित ऐवज जप्त करण्यात आला आहे. संशयितांनी मुद्देमाल बारामती व भवानी नगर येथील सोनारांना विकला असल्याचे कबूल केले.
हेही वाचा- रात्रीस खेळ चाले अवैध उत्खननाचा, या सगळ्याला आशीर्वाद कुणाचा?
हेही वाचा- मुलाच्या किरकोळ चुकीमुळे वडिलांची नदीत उडी घेऊन आत्महत्या