सातारा - जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्यावर प्राप्तिकर विभागाने छापा टाकला आहे. जरंडेश्वर साखर कारखाना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात असल्याचे सांगितले जाते. भाजपचे नेते किरीट सोमैया यांनी लक्ष घातल्यानंतर लगेच आठवडाभरात ही कारवाई सुरू झाल्याने या कारवाईला वेगळे महत्व आहे.
- CRPF च्या जवानांची टीम दाखल -
जरंडेश्वर कारखान्यात सीआरपीएफच्या जवानांची एक टीम दाखल झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवारांशी संबंधित कारखान्यांच्या संचालकांच्या घरी इन्कम टॅक्स विभागाकडून कारवाई केली जात आहे. फक्त जरंडेश्वरच नाही तर इतरही काही खासगी साखर कारखान्यांवर कारवाई सुरू असल्याचं समजते. हे सर्व साखर कारखाने अजित पवारांच्या निकटवर्तीयांचे असल्याचे सांगण्यात येते. कालच भाजप नेते किरीट सोमैया यांनी जरंडेश्वर कारखान्याला भेट दिली होती. ईडीनं यापूर्वीचं जरंडेश्वर साखर कारखाना सील केलेला आहे. साखर कारखान्याच्या संचालकांच्या घरी इन्कम टॅक्स विभागाची कारवाई सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.
- किरीट सोमैया यांनी घातले लक्ष -
भाजपा नेते किरीट सोमैया हे जरंडेश्वर साखर कारखान्यावर बुधवारी सकाळी दाखल झाले होते. यावेळी सभासदांनी त्यांचे जंगी स्वागत केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी त्यांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला होता. किरीट सोमैया यांनी यावेळी शेतकऱ्यांना पूर्णपणे न्याय दिला जाईल. कोणत्याही परिस्थितीत कारखाना बंद पडणार नाही. मात्र उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे कारखान्याच्या व्यवहाराची पूर्ण चौकशी होईल, असं सांगितलं होतं.
- ईडीकडूनही चौकशी सुरू -
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत झालेल्या घोटाळाप्रकरणी सातारा जिल्ह्यातील जरंडेश्वर शुगर्स या कारखान्याच्या ६६ कोटींची जागा, इमारत आणि यंत्रसामग्री यावर जप्ती आणण्यात आल्याची माहिती ईडीच्या सूत्रांकडून देण्यात आली होती. जरंडेश्वर सहकारी कारखाना २०१० मध्ये लिलावात काढण्यात आला होता. तेव्हा समर्पित किमतीपेक्षा कमी दराने या कारखान्याचा लिलाव करण्यात आल्याचे ईडीला चौकशीत आढळले होते. यानुसारच ही कारवाई करण्यात आली होती.
हेही वाचा - माझे नातेवाईक असल्यामुळेच तपास यंत्रणेच्या धाडी - अजित पवार