सातारा - खटाव तालुक्यातील पडळ येथील खटाव-माण अॅग्रो प्रोसिसिंग लिमिटेड या साखर कारखान्यावरील केमिस्ट अधिकारी जगदीप थोरात यांच्या मारहाणीतील मृत्यू प्रकरणी माजी आमदार प्रभाकर घार्गे यांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई वडूज पोलिसांनी केली. यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले असता शनिवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश वडूज न्यायालयाने दिले आहेत.
उच्च न्यायालयाने फेटाळला जामीन -
पोलिसांनी सांगितले, खटाव-माण अॅग्रो प्रोसिसिंग लिमिटेड या साखर कारखान्यावरील केमिस्ट अधिकारी जगदीप थोरात (रा. गोवारे ता. कर्हाड) यांच्या मृत्यूप्रकरणी वडूज पोलिसात एकूण 20 जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी उच्च न्यायालयात प्रकृतीचे कारण देत जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र, न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता.
हेही वाचा - भाजपा नगरसेविकेच्या वार्डात लसीकरण केंद्रावर विवाह सोहळ्याचे आयोजन, नागरिकांमध्ये संताप
घार्गेंविरुध्द निघाले अटक वॉरंट -
न्यायालयाने प्रभाकर घार्गे यांच्याविरुध्द अटक वॉरंट काढले होते. त्यानंतर येथे वैद्यकीय उपचारासाठी एका हॉस्पिटलमध्ये ते दाखल झाले होते. हॉस्पिटलमधून डीस्चार्ज दिल्यानंतर वडूज पोलिसांनी त्यांना साताऱ्यात ताब्यात घेतले. प्रभाकर घार्गे यांना वडूज येथील प्रथम वर्ग न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने शनिवारपर्यंत (दि .१५) पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. याप्रकरणी आतापर्यंत 8 संशयितांना वडुज पोलिसांनी अटक केली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख करत आहेत.
कोण आहेत प्रभाकर घार्गे ?
राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रभाकर घार्गे हे विधानपरिषदेचे सातारा-सांगली स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघाचे आमदार राहिलेले आहेत. ते सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक देखील आहेत. तसेच खटाव-माण साखर कारखान्याचे चेअरमनही आहेत.
हेही वाचा - ऑक्सिजन मिळवण्यासाठी पिंपळाच्या झाडावर टाकली मांड; इंदूरच्या वृद्धाचा अजब जुगाड