कराड (सातारा) - गेल्या काही वर्षात खवल्या मांजराची शिकार आणि तस्करीत वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर अभ्यासगट नेमून कृती आराखडा करण्यासाठी वनखात्यास मान्यता मिळाली आहे. त्यामुळे, राज्यात प्रथमच खवल्या मांजर प्रजातीचा सखोल अभ्यास होणार आहे.
खवल्या मांजर (भारतीय पेंगोलीन) शास्त्रोक्त नाव मानीस क्रासीकाऊडाटा ही एक महत्वाची प्रजाती असून वन्यजीव संरक्षण अधिनियम, 1972 अंतर्गत अनुसूची-1 मध्ये त्याचा समावेश आहे. ही प्रजाती महाराष्ट्रातील वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणात आढळून येते. परंतु, विविध कारणांमुळे या प्रजातीच्या अस्तित्वाला धोके निर्माण होत आहेत. तसेच, खवल्या मांजराची शिकार ही एक मोठी समस्या म्हणून समोर आली आहे. मुख्यत्वे शरिरावरील खवल्यांसाठी या प्रजातीची शिकार केले जाण्याचे प्रकार होत आहेत. यामध्ये संघटीत गुन्ह्यांच्या घटनाही उघडकीस आल्या आहेत.
हेही वाचा - सातारा : विजयी मिरवणूक ठरली अडचणीची; शिरवळच्या सरपंचांसह ५२ जणांवर गुन्हे दाखल
राज्य वन्यजीव मंडळाच्या ऑगस्टमध्ये झालेल्या 15 व्या बैठकीत या प्रजातीचे संरक्षण व संवर्धनासाठी उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे मत सदस्यांनी मांडले होते. या कारणास्तव अधिवास व्यवस्थापन, गुन्हेगारीवर आळा घालणे, गुप्त माहिती मिळवणे, जनजागृती करणे या बाबींचा अंतर्भाव करून खवल्या मांजर या प्रजातीच्या संरक्षण व संवर्धनासाठी कृती आराखडा तयार करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
राज्यात प्रथमच खवल्या मांजराच्या प्रजातीचा अभ्यास होणार
अंधश्रद्धेमुळे खवल्या मांजराची शिकार होते. तसेच, पारंपरिक चीनी औषधांसाठीही त्यांच्या वापर केला जातो. काही ठिकाणी खवल्या मांजराचे मासही खाल्ले जाते. गेल्या 2 वर्षात महाराष्ट्रात 20 हून अधिक खवल्या मांजराच्या शिकारीच्या घटना घडल्या आहेत. गेल्या काही वर्षात खवल्या मांजराची शिकार आणि तस्करीतही वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर अभ्यासगट नेमून कृती आराखडा करण्यास शासनाकडून वनखात्यास मान्यता मिळाली आहे. त्यामुळे, राज्यात प्रथमच खवल्या मांजराच्या प्रजातीचा अभ्यास होणार आहे.
शासनाच्या मंजुरीनंतर तांत्रिक अभ्यासगटाची स्थापना
शासनाच्या मंजुरीनंतर तांत्रिक अभ्यासगटही स्थापन करण्यात आला आहे. पुणे वन्यजीव विभागाचे वनसंरक्षक रमेश कुमार हे तांत्रिक अभ्यासगटाचे अध्यक्ष, तर सातारा वनविभागाचे उपवनसंरक्षक डॉ. भारतसिंह हाडा हे सदस्य सचिव आहेत. साताराचे मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, रत्नागिरी वन विभागाचे उपवनसंरक्षक दीपक खाडे, चिपळूण राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य विश्वास काटदरे, डॉ. वरद गिरी (पुणे), वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन सोसायटी ऑफ इंडियाचे संचालक नितीन देसाई यांची तांत्रिक समितीवर शासनाने निवड केली आहे.
आभ्यासगट समिती करणार हे काम..
खवल्या मांजर प्रजातीचे पर्यावरणशास्त्र, अस्तित्व व त्यांना असलेल्या धोक्यांचा, अवैध व्यापाराच्या व्याप्तीचा अभ्यास करणे, अवैध व्यापाराला आळा घालण्यासाठी संभावित क्षेत्राची निवड करणे, अधिवास व्यवस्थापन आणि संवर्धनासाठी उपाययोजना सुचवणे, हे या अभ्यासगट समितीचे काम असणार आहे.
हेही वाचा - सर्वाधिक उंचीवरून उडणार्या पट्टेवाल्या बदकांचे सूर्याचीवाडी तलावावर आगमन