कराड (सातारा) - पाटण तालुक्यातील तुपेवाडी गावात एकाच कुटुंबातील 11 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. बाधितांमध्ये पाच पुरुष, चार महिला आणि दोन मुलींचा समावेश आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा हादरून गेली असून सर्व ग्रामस्थांची तपासणी सुरू करण्यात आली आहे.
तुपेवाडी गावातील एका वृद्धाला आठ दिवसांपूर्वी त्रास होऊ लागल्याने ते कराडमधील खासगी रुग्णालयात उपचारासाठी गेले होते. त्यावेळी त्यांची कोरोना चाचणी केली असता ते पॉझिटिव्ह आढळून आले. त्यामुळे त्यांच्या निकटच्या संपर्कातील 12 जणांचे स्वॅब घेण्यात आले. त्यातील 11 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा हादरली आहे. सध्या तुपेवाडी गाव कंटेन्मेट झोनमध्ये असून सर्व ग्रामस्थांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. तळमावले प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी गावात तळ ठोकून आहेत.
कोरोनाची लागण झालेले सर्व जण गृह विलगीकरणात आहेत. त्यांच्यावर आरोग्य विभाग लक्ष ठेऊन आहे. संपूर्ण गावात फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. ग्रामस्थांनी आरोग्य विभागाच्या सूचनांचे पालन करून खबरदारी घेण्याचे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. उमेश गोंजारी यांनी केले आहे.
हेही वाचा - साताऱ्यातील युवकाचा खुन; तिघांना अटक
हेही वाचा - कराडमधील व्यापार्यांचा मिनी लॉकडाऊनला विरोध, सवलतीची मागणी