कराड (सातारा) - तालुक्यातील दिवशी घाटातील लूटमारीचा गुन्हा चोवीस तासांत उघडकीस आणण्यात ढेबेवाडी पोलिसांना यश आले आहे. यात कार चालकच लूटमारीचा सूत्रधार असल्याचे पुढे आले आहे. संशयित कार चालकाने घाटात लपवून ठेवलेले १ लाख २० हजार रुपयांचे दागिनेही जप्त करण्यात आले आहेत. अंकुश दिनकर पवार, असे चोरीच्या गुन्ह्यातील मुख्य संशयिताचे नाव आहे.
शिद्रुकवाडी येथील हौसाबाई कोळेकर (वय ७०) आजारी असल्याने गावातील अंकुश दिनकर पवार हा त्यांना स्वतःच्या कारमधून तळमावले येथील दवाखान्यात घेऊन गेला होता. हौसाबाई यांच्यासोबत त्यांची मुलगीही होती. दुपारी दवाखान्यातून घरी येत असताना दिवशी घाटात अज्ञाताने कार अडवली. चोरट्याने चाकूच्या धाकाने हौसाबाई यांच्या गळ्यातील सोनसाखळी व बोरमाळ हिसकावून घाटात धूम ठोकली होती. तसेच दागिने काढताना प्रतिकार केल्याने चोरट्याने हौसाबाई यांच्या हातावर चाकूने वार केला होता. भर दिवसा घडलेल्या या घटनेमुळे वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली होती. त्यानंतर स्थानिक ग्रामस्थ आणि पोलिसांनी दिवशी घाटाच्या परिसरात चोरट्याचा शोध घेतला असता, पोलीसांना कार चालक अंकुश पवार याचा संशय आल्याने त्याच्यावर लक्ष केंद्रीत करत चोवीस तासांत या गुन्ह्याचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. अंकुश पवार याने गुन्ह्याची कबुली देऊन साथीदाराच्या मदतीने कट रचल्याचेही तपासात सांगितले आहे. तसेच चोरीचे दागिने लपविलेली घाटातील जागाही दाखवली आहे. घाटातील एका कठड्याजवळ लपवून ठेवलेले दागिने पोलीसांनी जप्त केले आहे.
हेही वाचा-घरातून अडीच लाखांचे दागिने लंपास; अटकेनंतर आरोपी निघाला कोरोना पॉझिटिव्ह