कराड (सातारा) - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार विविध पातळ्यांवर प्रयत्न करीत आहे. या प्रयत्नांना बळ मिळावे, म्हणून सातारचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी तीन-चार दिवसात अत्यावश्यक सेवेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांचे कौतुक केले. दिवस-रात्र सेवा बजावणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची विचारपूस करून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
हेही वाचा... खबरदार..! जादा दराने जीवनावश्यक वस्तू विकाल तर...
राज्यातील पोलीस स्वत:च्या अडचणी बाजूला ठेवून नागरीकांसाठी रस्त्यावर तैनात आहेत. पोलिसांबरोबरच अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी खासदार पाटील यांनी त्यांच्याशी संवाद साधला. त्यांच्या अडीअडचणी समजावून घेतल्या. पोलिसांना समाजात वावरावे लागते. त्यामुळे पोलिसांसाठी मास्क व सॅनिटायझर या आवश्यक गोष्टी देण्याचा निर्णय घेतला.
सॅनिटायझर्सचे पाच लीटरचे १० कॅन आणि अडीच हजार मास्क सातारच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्याकडे सुपूर्द केले. नागरीकांनी सुध्दा कोरोना विरोधातील लढाईत सक्रीय सहभागी व्हावे. त्यासाठी घरातच थांबा आणि विषाणूचा प्रसार रोखा. पोलीस आपल्यासाठीच तैनात आहेत. त्यांना सहकार्य करा, असे आवाहन देखील खासदार श्रीनिवास पाटील यांनी केले आहे.