सातारा - किल्ले अजिंक्यतारा आणि प्रतापगडचे ऐतिहासिक महत्व लक्षात घेवून, केंद्र सरकारने या किल्ल्यांना राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करुन त्यांचे संवर्धन करावे, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडु यांच्याकडे केली. उदयनराजे भोसले यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांची दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी उदयनराजे भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजमुद्रेची प्रतिकृती उपराष्ट्रपती यांना भेट दिली.
वारसा जतन करावा
खासदार उदयनराजे भोसले यांनी उपराष्ट्रपतींना ते दोन्ही किल्ले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याचा वारसा असल्याचे सांगितले. तसेच महाराजांच्या पराक्रमाचा अमुल्य असा ऐतिहासिक ठेवा संपूर्ण देशात पहायला मिळत असल्याचे निदर्शनास आणुन दिले. तसाच वारसा सातारा जिल्ह्याला लाभला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा साम्राज्याच्या पाऊलखुणा आजही कायम आहेत. तोच वारसा जतन करण्याचा प्रयत्न आम्ही करत असल्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी सांगितले.
सातारा जिल्ह्याचे महत्व
सातारा जिल्ह्याला सुमारे २० किल्ल्यांचा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. तसेच अठरा धरणांची देणगी सुध्दा सातारा जिल्ह्याला मिळाली आहे. आशिया खंडातील सर्वांत मोठा पवनचक्कीचा प्रकल्प हा सुध्दा साताऱ्यात आहे. इतकच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या विजेच्या मागणीपैकी जवळपास ३० टक्के वीज निर्मिती साताऱ्यात होते. तसेच संपूर्ण देशात पर्यटनामध्ये अव्वल स्थानावरचे महाबळेश्वरसारखे थंड हवेचे ठिकाण सुध्दा सातारा जिल्ह्याला लाभले आहे. रंगीबेरंगी फुलांनी भरुन जाणाऱ्या कास पठाराला जागतिक वारसा लाभला आहे.
अजिंक्यतारा व प्रतापगडाचे महत्त्व
मराठा साम्राज्याची चौथी राजधानी असलेल्या साता-याच्या अजिंक्यतारा किल्ल्याला मोठे ऐतिहासिक महत्व आहे. त्याचबरोबर प्रतापगडाची लढाई ही महाराष्ट्रातल इतिहासातील एक महत्वाची लढाई आहे. ही मराठा साम्राज्याच्या इतिहासातील सर्वांत रोमांचक घटना मानली जाते. शिवाजी महाराज यांनी अदिलशहाचा सेनापती अफजलखानाच्या रुपाने आलेले स्वराज्यावरील संकट परतावून लावताना, त्याचा शेवट करुन याच मातीत त्याची कबर बांधली. या लढाईत महाराजांनी गनिमी काव्याने शत्रुला संपवले नसते तर इतिहास कदाचित वेगळा पाहायला मिळाला असता. इतकेच नाही तर स्वराज्याची निर्मितीसुध्दा झाली नसती आणि या देशातील लोकशाही पहायला मिळाली नसती. त्यामुळे महाराजांच्या गनिमी काव्याचा इतिहास प्रतापगडाच्या रुपाने जतन करावा जेणेकरुन तो साऱ्या जगाला प्रेरणादायी ठरेल. त्यासाठी अजिंक्यतारा व प्रतापगडाला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्याची मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे.