सातारा - महाबळेश्वर येथील विवाहित महिलेवर सातारा, पोलादपूर, चिपळूण येथे वारंवार अत्याचार करुन त्याचे चित्रीकरण करत 'तू जर माझ्यासोबत लग्न केले नाहीस तर जीवे मारेन' अशी धमकी दिल्याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात एका युवकावर गुन्हा दाखल झाला आहे.
छायाचित्रण व चित्रीकरणाचा वापर
सलीम लियाकत मुजावर (वय ३0, रा. बाबर कॉलनी, करंजे पेठ, सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव असून त्याला रात्री उशिरापर्यंत अटक करण्यात आलेली नव्हती. पोलिसांनी सांगितले की, संबंधित महिला महाबळेेश्वर परिसरात राहत असली तरी काही दिवस ती सातारा येथे राहत होती. याचवेळी तिची सलीम लियाकत मुजावर बरोबर ओळख झाली. या ओळखीनंतर सलीमने संबंधित महिलेशी जबरदस्तीने शारिरीक संबंध ठेवत त्याचे मोबाईलवर फोटो काढून चित्रीकरणही केले. यानंतर सलीमने हे फोटो आणि चित्रीकरण सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. 'तू जर माझ्याशी लग्न नाही केलेस तर हे चित्रीकरण, फोटो तुझे सासू, सासरा, पति, आई, वडील आदींना दाखविणार,' अशी धमकी दिली.
वेळोवेळी केला अत्याचार
यास नकार देताच सलीमने संबंधित महिलेवर मंगळवार पेठेतील खारी विहिर, पोलादपूर, चिपळूण येथे वारंवार अत्याचार केला. हा संपूर्ण प्रकार ऑक्टोबर ते २३ नोव्हेंबर २०२० या कालावधीत वेळोवळी घडला आहे. याप्रकरणी संबंधित पीडित महिलेने सलीमच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला असून त्याला रात्री उशिरापर्यंत अटक करण्यात आलेली नव्हती. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे करत आहेत.