सातारा - सातार्याचा अजिंक्यतारा किल्ल्यावर स्वच्छतेचे आणि उत्खननाचे काम सुरू आहे. या कामादरम्यान एका अवजड लोखंडी पेटीचा भाग सापडला आहे. तसेच एक लोखंडी ट्रंकही मिळून आला आहे. पुरातत्व विभागाने लोखंडी पेटी व इतर अवशेष रविवारी ताब्यात घेतले आहेत. मात्र, ही पेटी किल्ल्यावर कोणी व का नेली असावी? याचं गूढ अद्याप कायम आहे. त्यामुळे आता इतिहास अभ्यासक आणि पूरातत्व विभागाकडून या पेटीच्या वापराचा शोध लावला जात आहे.
अजिंक्यताऱ्यावर उत्खननामध्ये सापडली आणखी एक पेटी पेटीबरोबरच लोखंडी ट्रॅकही साताऱ्याचा अजिंक्यतारा हा इतिसाची साक्ष देणारा गडेकोट, स्वराज्याच्या राजधानीचा मान या किल्ल्यालाही मिळाला आहे. मराठा साम्राज्याची चौथी राजधानी म्हणून अजिंक्यतारा गडाची ओळख. गेल्याच आठवड्यात गडावर स्वच्छतेचे काम सुरू असताना राजा शिवछत्रपती परिवार या संस्थेच्या स्वयंसेवकांना जुना दगडी चौथरा व सुमारे एक टन वजनाची लोखंडी पेटी सापडली होती. त्या ठिकाणी आणखी काही पुरातन वस्तू मिळण्याची शक्यता लक्षात घेऊन रविवारी छत्रपती शिवाजी वस्तू संग्रहालयाचे अभिरक्षक प्रवीण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी उत्खननाला सुरुवात करण्यात आली.
ऐतिहासिक वाड्याच्या समोरच आढळून आलेल्या दगडी चौथऱ्याजवळील मातीच्या ढिगाऱ्यात जुन्या इमारतीचे अवशेष आढळून आले आहेत. त्याच ढिगार्यात लोखंडी पेटीचा दरवाजा व काही भाग मिळून आला. त्याचबरोबर त्या ठिकाणी एक लोखंडी ट्रॅकही सापडला आहे. या ऐतिहासिक वस्तुचा वापर नेमका त्या काळात कशासाठी केला जात होता. ती मराठा कालखंडातील आहे की ब्रिटीश या संदर्भात आता प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्याचाच शोध आता इतिहास अभ्यासक घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
पेटीच्या वापरा मागील सत्य? गेल्या आठवड्यात सुमारे एक टन वजनाची पहिली पेटी सापडल्यानंतर काडतूसे आदी ठेवण्यासाठी तिचा वापर होत असावा, असा कयास व्यक्त करण्यात आला होता. मात्र आज दुसऱ्या पेटीचे अवशेष व लोखंडी ट्रंकसारखा भाग सापडल्याने या वस्तूंच्या वापराबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. त्या परिसरात अधिक उत्खनन होण्याची आवश्यकता साताऱ्यातील जिज्ञासा इतिहास संशोधन व संवर्धन संस्थेचे कार्याध्यक्ष निलेश पंडित यांनी व्यक्त केली. 'घाईगडबडीत कोणता तर्क व्यक्त करणे चुकीचे होईल. तज्ञांचे यावर मार्गदर्शन घेऊन बोलणे उचित ठरेल. आम्हीं त्यावर काम सुरू केला आहे,' असेही श्री. पंडित यांनी स्पष्ट केले.नगरपालिकेने पुरातत्व विभागाला शुक्रवारी दिल्या पत्र दिल्यानंतर आज या विभागाने लोखंडी पेटी व सापडलेले अवशेष ताब्यात घेऊन किल्ल्यावरून खाली आणले. या संदर्भात छत्रपती शिवाजी वस्तू संग्रहालयाचे अभिरक्षक प्रवीण शिंदे म्हणाले, 'या किल्ल्यावर उत्खनन होऊन ढिगाऱ्याखाली गडप झालेल्या ऐतिहासिक वस्तूंवर प्रकाश पडावा, अशी अपेक्षा सातारकर इतिहासप्रेमींनी व्यक्त केली आहे. यासंदर्भात आम्ही वरिष्ठांकडे पाठपुरावा करत आहोत.'