सातारा - कराडमधील कृष्णा नदीवरील पूल आज (दि.२९ जुलै) दुपारी साडेतीनच्या सुमारास नदीला आलेल्या पुरामुळे वाहून गेल्याची घटना घडली. नदीने उग्र रूप धारण केल्याने मागील आठवड्यापासून हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. यामुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.
पूल वाहून गेल्याची माहिती मिळताच पोलीस तसेच प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पूलाचा पडलेला भाग बघण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. गुहागर-पंढरपूर मार्गाला जोडणाऱ्या या पुलाचे बांधकाम जुने झाले होते. तसेच पुराच्या पाण्याचा दबाव वाढल्याने पुलाच्या मधला भाग वाहून गेला आहे.
काही दिवसांपूर्वी नागरिकांचा विरोध डावलून या पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. प्रशासनाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे.