सातारा - बिग बॉसमधील स्पर्धक अभिजित बिचुकले याच्यावरती खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी तो न्यायालयीन कोठडीत कळंबा कारागृहात आहे. बिग बॉस 2 च्या सत्रात तो स्पर्धक असल्याने संपूर्ण महाराष्ट्राचे त्याच्या जामीनाकडे लक्ष लागले आहे. गुरुवारी सरकारी पक्षाच्यावतीने युक्तिवाद न झाल्याने शुक्रवारी प्रथम युक्तिवाद आणि नंतर जामीनावर सुनावणी झाली. मात्र यावेळीदेखील न्यायालयानं जामीन फेटाळा आहे.
बिचुकलेवर सात वर्षांपासून चार्ज शीट दाखल होऊन सुद्धा तो कोर्टात हजर राहिला नाही. यासोबतच अनेक वेळा पोलीस संरक्षण घेत असतानासुद्धा पोलिसांनी त्याला अटक का केली नाही ? असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला आहे. तसेच मुंबईत असणाऱ्या कार्यक्रमाला तो गेला तर माघारी येण्याची शक्यता नाही, असे म्हणत न्यायालयाने जामीन फेटाळला आहे.
काय आहे प्रकरण -
चेक बाऊन्सप्रकरणी अटक करण्यात आलेल्या अभिजीत बिचुकलेला न्यायालयाने २२ जूनलाच जामीन मंजूर केला आहे. मात्र, २०१२ साली त्याच्यावर दाखल असलेल्या खंडणी प्रकरणाची सुनावणी सुरू होती. त्यावर न्यायालयाने जामीन फेटाळला आहे. त्यामुळे अभिजीत बिचुकलेच्या अडचणीत वाढ झाली आहे. बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वातून घराघरात चर्चेचा विषय बनलेल्या अभिजीत बिचुकलेला आरे पोलिसांनी घरातून अटक केली होती.