सातारा : व्यसनमुक्त युवक संघाचे मार्गदर्शक, वारकरी नेते ह. भ. प. बंडातात्या कराडकर यांना अर्धांगवायुचा सौम्य झटका आला आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून सध्या त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
कीर्तनावेळी त्रास जाणवला : वडूज आणि पुणे येथे बुधवारी बंडातात्यांचे कीर्तन होते. कीर्तनावेळी त्यांना थोडा त्रास जाणवला. मात्र, किरकोळ औषधे घेऊन त्यांनी पुण्यातच मुक्काम केला. गुरूवारी सकाळी पिंप्रद (ता. फलटण) येथे पोहोचल्यावर पुन्हा त्रास होऊ लागला. अनुयायांनी त्यांना फलटणमधील निकोप हॉस्पिटलमध्ये दाखल केले. बंडातात्यांना अर्धांगवायुचा सौम्य झटका आल्याचे निदान होताच हृदयरोग तज्ज्ञ डॉ. जे. टी. पोळ यांनी तातडीने उपचार सुरु केले.
दुसरा झटका आल्याने पुण्याला हलवले : बंडातात्यांच्या विविध वैद्यकिय तपासण्या केल्यानंतर रक्तदाब आणि रक्तातील साखर वाढल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर डॉक्टरांनी उपचाराची दिशा निश्चित केली. गुरूवारी दिवसभर उपचार केल्यानंतर बंडातात्यांच्या प्रकृतीत सुधारणाही झाली होती. रात्री त्यांना झोपही चांगली लागली. मात्र, शुक्रवारी सकाळी पुन्हा अर्धांगवायुचा दुसरा झटका आल्याने पुढील उपचारासाठी त्यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात हलविण्यात आले.
बंडातात्यांची प्रकृती स्थिर : बंडातात्यांना अर्धांगवायुचा दुसरा झटका आल्याने मेंदूच्या रक्तवाहिन्यांच्या तपासणीसाठी त्यांना दिनानाथ मंगेशकर दाखल केले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून काळजी करण्याचे कारण नाही, असे उपचार करणाऱ्या डॉक्टर जे. टी. पोळ यांनी सांगितले.
बंडातात्या कराडकर : वारकरी संप्रदायातील धडाडीचे संत म्हणून बंडातात्या कराडकर ओळखले जातात. ते राज्यभर व्यसनमुक्तीची चळवळीसाठी काम करतात. मागील काही वर्षात बंडातात्या कराडकर हे नेहमी चर्चेत राहिलेले नाव आहे. अनेक वादांमध्ये बंडातात्या यांचे नाव समोर आलेले आहे. बंडातात्या कराडकरांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांना आषाढी एकादशीच्या पूजेसाठी पंढरपुरात येण्यास विरोध केला होता. महाविकास आघाडीने सरकारच्या वाईनबाबतच्या धोरणावर टीका करताना सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे यांच्यासंदर्भात त्यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते, यामुळे देखील ते चर्चेत आले होते.
पद्मश्री पुरस्काराची शिफारस नाकारली : केंद्र सरकारकडून दिला जाणारा मानाचा पद्मश्री पुरस्कार हा बंडा तात्यांनी नाकारला होता. 2019च्या पद्मश्री पुरस्कारासाठी राज्य सरकारने केंद्राकडे प्रस्ताव पाठवण्यासाठी बंडातात्या कराडकरांकडून त्यांची माहिती मागवली. त्यावर आपण कोणतााही पुरस्कार स्वीकारत नाही, असे सांगत त्यांनी स्वतःच्या कार्याची माहिती देण्यास नकार दिला होता.