सातारा - साताऱ्याच्या मंजूर वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रक्रीयेवरुन भाजपचे खासदार उदयनराजे भासले व त्याच पक्षाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यात अहमहमिका लागली आहे. होऊ घातलेल्या पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही रस्सीखेच पहायला मिळत आहे.
४९५ कोटी ४६ लाखांच्या निधीस मान्यता
सातारा वैद्यकीय महाविद्यालयाच्या उभारणीला आता मूर्त स्वरूप प्राप्त झाले असून महाविद्यालयासाठीची जागा हस्तांतरणानंतर शंभर विद्यार्थी क्षमतेचे महाविद्यालय आणि ५०० खाटांचे रुग्णालय उभारणीसाठी एकूण ४९५ कोटी ४६ लाख रुपये एवढ्या निधीला प्रशासकीय मान्यता यापूर्वीच मिळाली आहे.
शिवेंद्रसिंहराजेंनी मानले अजित पवारांचे आभार
एका पत्रकाद्वारे आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्यामुळे साताऱ्याच्या वैद्यकीय महाविद्यालयासाठी अधिष्ठाता, प्राध्यापक अशी एकूण ५१० पदे भरण्यास राज्य सरकारने मान्यता दिली असल्याचे सांगत वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्न पूर्णतः मार्गी लावल्याद्दल अजित पवार यांचे आभार मानले आहेत.
उदयनराजेंनी पाहणी करत दिल्या सूचना
खासदार उदयनराजे भोसले यांनी नियोजित जागेची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या.
पदनिर्मितीस मान्यता
वैद्यकीय महाविद्यालयासाठी आवश्यक असणारी पद निर्मिती करावी आणि ही सर्व पदे भरून प्रत्यक्ष वैद्यकीय महाविद्यालय सुरू करावे, अशी मागणी शिवेंद्रसिंहराजे यांनी अजित पवार यांच्याकडे केली होती. याबाबत शिवेंद्रसिंह भोसले यांनी पत्रव्यवहारही केला होता. शिवेंद्रसिंहराजे यांच्या मागणीनुसार राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या मानांकानुसार विविध संवर्गातील ५१० पदे निर्माण करण्यास तसेच पदनिर्मिती, यंत्रसामग्री, उपकरणे, आवर्ती खर्च, बाह्यस्त्रोत खर्च व नव्याने अनुषंगिक शैक्षणिक रुग्णालय निर्मितीसाठी येणाऱ्या खर्चास निधी उपलब्ध करून देण्यास मान्यता दिली आहे, असे त्यांच्या वतीने देण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
उदयनराजेंनी घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट
खासदार उदयनराजे यांनी प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या उभारणी प्रक्रियेत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सहभाग नोंदवावा, अशी मागणी करत आज (दि. ३ फेब्रुवारी) खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी सध्या खासदार उदयनराजे दिल्लीत आहेत. यावेळी त्यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांची भेट घेवून सातार्यातील वैद्यकीय महाविद्यालयासंदर्भात विविध प्रश्नांवर सकारात्मक चर्चा केल्याचे सांगण्यात येते. वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रक्रियेत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सहभाग घ्यावा तसेच महाविद्यायलामध्ये विद्यार्थ्यांच्या जास्तीत जास्त वाढीव जागांना परवानगी मिळावी, अशी मागणी उदयनराजेंनी आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे केली आहे.
हेही वाचा - सांडपाण्यामुळे साताऱ्याच्या सार्वजनिक आरोग्यात 'कालवा'कालव !