सातारा- जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पुराचा संभाव्य धोका निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत कराड आणि पाटण तालुक्यातील नदीकाठच्या 189 कुटुंबातील 755 जणांना नातेवाईकांकडे तसेच नगरपालिका शाळा या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.
कराड तालुक्यातील तांबवे गावातील 50 कुटुंबातील 207, कराड शहरातील 42 कुटुंबातील 163, नांदगाव येथील 12 कुटुंबातील 49, काले येथील 15 कुटुंबातील 58, टाळगाव येथील 30 कुटुंबातील 118 व्यक्तींना स्थलांतरित करण्यात आले आहे. तर पोतले येथील 12 कुटुंबातील 52, येणके येथील 3 कुटुंबातील 13, आणे येथील 8 कुटुंबातील 30 आणि पाटण शहरातील 5 कुटुंबातील 21 व्यक्तींना स्थलांतरित करण्यात आले आहे.
हेही वाचा-Maharashtra Corona : रुग्णसंख्येत किंचित घट! ६७५३ नवीन रुग्ण, १६७ रुग्णांचा मृत्यू
मदत कार्य सुरू-
पाटण तालुक्यातील मिरगाव येथील 150 व्यक्ती, आंबेघर आणि ढोकवळे येथील 100 जणांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. वाझे येथील 50 व्यक्तींना बोटींनी हलविण्याचे काम सुरू आहे. एक टीम एनडीआरएफच्या मदतीसाठी मिरगाव येथे पोहोचली आहे. भुवनेश्वर येथून आणखी दोन टीमला पाचारण करण्यात आले होते. त्या पुण्यातून कराडकडे रवाना झाल्या आहेत, अशी माहिती जिल्ह्याधिकारी शेखर सिंह यांनी दिली आहे.
हेही वाचा-नागपुरात गोळीबार : क्षुल्लक वादातून केलं कृत्य; सहा जणांना अटक
यशवंतराव चव्हाण यांची समाधी पाण्याखाली...
मुसळधार पाऊस आणि कोयना धरणातून सोडण्यात येत असलेल्या पाण्यामुळे कोयना आणि कृष्णा नदीला महापूर आला आहे. महापुराचे पाणी शुक्रवारी सायंकाळी प्रीतिसंगमाजवळच्या स्वामीच्या बागेत शिरले. त्यामुळे बागेत असलेली दिवंगत यशवंतराव चव्हाण यांची समाधी पाण्याखाली गेली आहे. तसेच कृष्णा घाटावरील कृष्णामाई मंदिरातही पुराचे पाणी शिरले आहे. पुरामुळे कृष्णा घाटाकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला आहे.
हेही वाचा-ठाण्यात झाडे पडण्याचे सत्र... दोन महिन्यांत 182 झाडे पडून 29 वाहनांचे नुकसान
बाधितांसाठी मदतीचे आवाहन...
अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या लोकांसाठी चादरी तसेच बिस्किट, चिवडा फरसाण राजगिरा लाडू या स्वरूपामध्ये तसेच तांदूळ, आटा, डाळ, तेल, तिखट मीठ इत्यादी कोरडा शिधा अशी मदत जिल्हाधिकारी कार्यालयात पुरवठा विभागात स्वीकारली जाणार आहे. बाधित लोकांसाठी सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाने केले आहे.
विविध घटनांमध्ये 6 जणांचा मृत्यू
सातारा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे कोंढवळे येथे पाच घरे पूर्णपणे मातीच्या ढिगाऱ्याखाली गेली आहेत. यामध्ये दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. तर, इतर ठिकाणी विविध घटनांमध्ये 6 जणांचा मृत्यू झाला आहे. सातारा जिल्ह्यात सद्य:स्थितीत पश्चिम भागात जोरदार अतिवृष्टी होत आहे. जिल्ह्यातील सर्व धरणातून पाण्याचा विसर्ग नदी पात्रात होत आहे.
काळजी घेण्याचे आवाहन
अतिवृष्टीमुळे नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत पुराच्या पाण्यात प्रवेश करु नये. नदी पात्राच्या कडेला अथवा धोक्याच्या ठिकाणी वास्तव्यास असल्यास, तत्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत व्हावे. मुसळधार पावसात आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये. जुन्या मोडकळीस आलेल्या घरात अथवा इमारतीत आश्रय घेऊ नये. नदी नाल्याच्या पुलावरुन पाणी वाहत असल्यास, कोणत्याही परिस्थितीत पूल ओलांडू नये. तसेच, अफवांवर विश्वास ठेऊ नये आणि अफवा पसरवूही नयेत असे, आवाहन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.