कराड (सातारा) - तालुक्यातील विंग गावात कोरोनाबाधित महिलेवर गुपचूप अंत्यसंस्कार करणे चांगलेच महागात पडले आहे. कारण, महिलेच्या अंत्यसंस्काराला उपस्थित असणार्या ग्रामपंचायत कर्मचार्यासह सहा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान, संबंधित मृत महिलेच्या घराचा परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे.
विंग गावातील 78 वर्षीय महिला घरात पाय घसरून पडली होती. आराम मिळावा, म्हणून तिच्या लेकीने तिला लोणंदला (ता. खंडाळा, जि. सातारा) नेले होते. लोणंद (ता. खंडाळा) येथील एका खाजगी रूग्णालयात उपचार सुरू असताना त्या महिलेचे स्वॅब घेण्यात आले असता ती पॉझिटिव्ह आढळली. रूग्ण महिलेची परिस्थिती पाहून डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी कोव्हिड रूग्णालयात हालविण्यास सांगितले असता नातेवाईक तिला सातार्यातील खासगी रूग्णालयात घेऊन निघाले. मात्र, वाटेतच तिचा मृत्यू झाला.
नातेवाईकांनी ही बाब लपवली आणि तिचा मृतदेह विंग येथे आणला. मृतदेहावर अंत्यसंस्कार झाले. परंतु, लोणंदमधील खासगी रुग्णालयाने सातारा आरोग्य विभागाला माहिती कळविली. सातार्यातून ही माहिती कोळे (ता. कराड) प्राथमिक आरोग्य केंद्राला कळविण्यात आल्यानंतर एकच खळबळ उडाली.
विशेष म्हणजे मृत महिलेची लेक लोणंद येथे आशा सेविका असून या घटनेमुळे प्रशासनासह अंत्यसंस्काराला उपस्थित असणार्यांची झोपच उडाली. कोळे प्राथमिक केंद्राने कॅम्प घेऊन 40 जणांची चाचणी केली. त्यामध्ये 9 वर्षाच्या मुलीसह महिला आणि चार पुरूष कोरोनाबाधित आढळले. त्यात एका ग्रामपंचायत कर्मचार्याचाही समावेश आहे. चार महिन्यानंतर गावात कोरोनाने शिरकाव केल्याने आरोग्य विभागापुढील पेच वाढला आहे.
हेही वाचा - पाटणमध्ये बोगस कोरोना चाचण्या, डॉक्टरसह लॅब चालकावर गुन्हा दाखल
हेही वाचा - सातारकरांनो नियम पाळा! '...तर कठोर पावले उचलू', पोलीस अधीक्षकांचा इशारा