वाळवा(सांगली) - उन्हाळ्यात पशुपक्षांकडे दुर्लक्ष होवू नये म्हणून प्रत्येकाने आप-आपल्या घरी पक्ष्यांसाठी पाणी व धान्य ठेवावे जेणेकरुन पशु-पक्ष्यांना यांचा उपयोग होईल, असे आवाहन पशुसंवर्धन पर्यवेक्षक वैभवकुमार राजमाने यांनी केले आहे. ते वाचन चळवळ, वाटेगावकडून आयोजित ऑनलाईन संवादात बोलत होते. यावेळी त्यांनी मुलांनी घरी बसून सामाजिक उपक्रमांमध्ये वेळ घालवावा, असा सल्ला दिला.
वाटेगाव येथील वाचन चळवळीच्या या ऑनलाईन संवादात जलजीवन उपक्रमाविषयी राजमाने यांनी माहिती दिली. पक्षीमित्र चंद्रकांत माने यांनी अनेक पक्ष्यांच्या जाती महत्त्व व संवर्धना विषयी मार्गदर्शन केले. यानंतर जलजीवन उपक्रमाची सुरुवात सलोनी शिंदे, प्रणाली पाटील, सार्थक शिदे, ओमकार राजमाने या मुलांनी आपल्या घरी केली.
जलजीवन हा उपक्रम १००० व्यक्तींनी केला तर, रोज एका व्यक्तीकडे ५ पक्षी आले धान्य व पाणी पिले तर रोज आपण ५००० हजार पक्ष्यांची तान व भूक भागवू शकतो. हा विचार करा व हा उपक्रम घरीच करा. बाहेर पडू नका, असे आवाहन वाचन चळवळीचे संयोजक राहूल वेदपाठक यांनी केले. जलजीवन उपक्रम राबवल्याचे फोटो व व्हिडिओ वाचन चळवळीच्या ग्रुपवर पाठवून द्यावेत. जलजीवन पशूपक्षी संवर्धन हा उपक्रम प्रत्येकाने घराच्या मोकळ्या जागेमध्ये घराबाहेर न पडता करावे, असे देखील वेदपाठक म्हणाले.