सांगली - दहा हजार रुपयांची लाच घेताना सांगली पोलीस दलातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. हे दोन्ही कर्मचारी इस्लामपूर पोलीस ठाण्यात कार्यरत होते. डुक्कर चोरी प्रकरणात अटक झालेल्या संशयितांना गुन्ह्यात सहकार्य करण्यासाठी लाच स्वीकारताना अटक करण्यात आली आहे.
सांगलीच्या इस्लामपूर येथील मंत्री कॉलनी परिसरात राहणार्या दोघांवर 20 सप्टेंबरला डुक्कर चोरीप्रकरणी इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. यात संबंधितांना पोलिसांनी अटक करुन त्यांना पोलीस कोठडीही मिळाली होती.
हेही वाचा - सांगली विधानसभेची उमेदवारी दादा घराण्यातच द्या, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक
याप्रकरणी अटक झालेल्या संशयितांना गुन्ह्यात सहकार्य करण्यासाठी इस्लामपूर ठाण्यातील सहाय्यक पोलीस फौजदार बाळासाहेब केशव पाटील आणि हेडकॉन्स्टेबल सतीश मारुती माळी या दोघांनी दहा हजारांच्या लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदारांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली होती. त्यानुसार इस्लामपूर पोलीस ठाण्यात बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सापळा रचून पाटील आणि माळी यांना दहा हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली.
हेही वाचा - पावसाळ्यात दुष्काळ... पाणी टंचाईच्या संकटाने सांगलीतील दुष्काळग्रस्त करतायेत स्थलांतर